विद्यापीठाकडून कच्चा आराखडा मागवला

मुंबई : येत्या बुधवारपासून महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका सोमवारी नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याकरीता पालिकेने विद्यापीठाकडून कच्चा आराखडा मागवला असून या आराखडय़ावर आधारित नियमावली जाहीर केली जाईल. त्यात शाळांच्या धर्तीवर ५० टक्के उपस्थिती ही अट ठेवण्यात येणार आहे.

आता महाविद्यालये देखील २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यासाठी पालिकेतर्फेसोमवारी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

दोन व्यक्तींमधील अंतर, मुखपट्टी, पन्नास टक्के उपस्थिती, विद्यार्थी व शिक्षकांच्या लशीच्या दोन्ही मात्रा होऊन १४ दिवस झालेले असावेत या मुख्य अटी असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याकरीता महाविद्यालयांतील वर्ग दोन सत्रांमध्ये घेता येतील का याचीही चाचपणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विद्यार्थ्यांंचे किंवा शिक्षकांचे लसीकरण झालेले नसल्यास त्याकरीता विशेष शिबीर भरवण्याची गरज आहे का याचा आढावा घेऊन तसे शिबीरही भरवले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महाविद्यालये सुरु करण्यासाठी  विद्यापीठाकडूनही कच्चा आराखडा मागवला आहे. त्यांच्याकडे किती मनुष्यबळ आहे, किती विद्यार्थी आहेत, किती शिक्षक व विद्यार्थ्यांंचे लसीकरण झालेले आहे, त्यानुसार ५० टक्के उपस्थितीची अंमलबजावणी कशी करता येईल हे ठरवण्याकरीता काय करता येईल याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. ती आल्यानंतर नियमावली तयार करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.