मुंबई : कांदिवली पूर्व येथील ठाकूर गाव परिसरातील मशिदीवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या त्रासाची वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांच्या कृतीची उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली. तसेच परिमंडळ सातच्या पोलीस उपायुक्तांना बुधवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
स्थानिक रीना रिचर्ड यांनी मशिदींवरील भोंग्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मशिदीमध्ये पहाटे अजान देण्यासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर केला जातो हे दाखवणाऱ्या चित्रफितीही त्यांनी समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध केल्या होत्या. मशिदीच्याजवळच ईएसआयएस हे रुग्णालय असल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
निकषाचे उल्लंघन..
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी रिचर्ड यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. ईएसआयएस रुग्णालय आणि मशिदीमधील अंतर ९० मीटर आहे, जे ध्वनिप्रदूषण नियमांनुसार शांतता क्षेत्राच्या १०० मीटरच्या निकषात मोडत असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने परिमंडळ सातच्या पोलीस उपायुक्तांना बुधवारी तातडीने न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.