मुंबई : प्राथमिक शिक्षणातील हिंदी सक्तीविरोधात सरकारच्या निर्णयाची प्रतिकात्मक होळी केल्याप्रकरणी डॉ. दीपक पवार यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांविरोधात आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आझाद मैदान परिसरात २९ जून रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सहभागी झाले होते. या आंदोलनासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच जमावबंदीचा आदेश झुकारून घोषणाबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. दीपक पवार, संतोष शिंदे, संतोष घरत, वैभव मयेकर, शशी पवार, युगेंद्र साळेकर, संतोष वीर, इतर २५० ते ३०० कार्यकर्ते यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०,२२३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात सीएसएमटी परिसरातील महापालिका मार्गावरील मराठी पत्रकार संघ येथे २९ जूनला दुपारी २ च्या सुमारास आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरकारी निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. तसेच बेकायदेशीररित्या जमाव एकत्र करून घोषणाबाजी करण्यात आली, असा आरोप आहे.
महायुती सरकारने राज्यात शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. या निर्णयाला राजकीय विरोध झाला. यावेळी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांच्या माध्यमातून २९ जून रोजी तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे डाॅ. दीपक पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन होते. पवार व इतर नेत्यांनी सरकारच्या या आदेशाविरोधात राज्यभरात एक चळवळ उभी केली.
हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात २९ जून रोजी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने आंदोलन केले. त्यावेळी सरकारच्या निर्णयाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजीही केली. पण आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे. यावेळी शिवसेनेचे (ठाकरे) विभागप्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख संतोष घरत, शाखाप्रमुख वैभव मयेकर, शाखाप्रमुख शशी पवार व कुलाबा सन्वयक संतोष वीर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व ३०० हून अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.