मुंबई : शिवसेना शाखा पाडण्याची कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. परब यांच्यासह अन्य १० जणांवर आरोप निश्चिती करण्यात आल्याने आता त्यांच्यावर खटला चालणार आहे.
खासदार आणि आमदारांविरुद्धच्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी ही आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडली. आपल्याविरोधातील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे आणि आपण निर्दोष असल्याचे परब यांच्यासह अन्य आरोपींनी सांगितल्यावर न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित करून खटला चालवण्यात येईल हे स्पष्ट केले.
प्रकरण काय ?
मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयामधील शिवसेना शाखा पडल्याच्या निषेधार्थ शिवसेना कार्यकर्त्यांनी २०२३ मध्ये मोर्चा काढला होता. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती.
या मारहाणीच्या घटनेच्या वेळी आमदार परब तेथे उपस्थित होते. परब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक अभियंता अजय पाटील (४२) यांना मारहाण केली आणि त्यांना धमकी दिल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
