मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. माटुंगा – मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावर ब्लाॅक घेण्यात येणार असून, जलद मार्गावरून लोकल धावतील. परंतु, जलद मार्गाच्या फलाटाअभावी विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर रेल्वे स्थानकांवर लोकलला थांबा नसेल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. तर, भायखळा स्थानकावर तांत्रिक कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून रविवारी दिवसकालीन ब्लाॅक नाही.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्या येतील. या लोकल सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबाने पोहोचतील. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ दरम्यान सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्ग व ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे : पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप आणि डाऊन

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत पनवेल ते सीएसएमटी लोकल सेवा आणि सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल लोकल सेवा रद्द असेल. पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक काळात पोर्ट मार्ग उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : माहिम ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. जलद लोकलच्या फलाटाअभावी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकात लोकलला थांबा नसेल. तर, लोअर परळ, माहीम आणि खार रोड येथील फलाटाची लांबी कमी असल्याने दोन वेळा लोकल थांबेल. सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल/ चर्चगेट अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. ही लोकल खार रोड स्थानकात दोन वेळा थांबेल. तर, माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी येथे थांबा नसेल. ब्लाॅकमुळे काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक नसेल.

भायखळा येथे ब्लाॅक

परळ ते भायखळा दरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे कोणार्क आणि हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.