Central Railway Local Train Update: मध्य रेल्वेवरील नियमित प्रवाशांची इच्छित लोकल कायम उशिराने धावते. लोकल अवेळी धावत असल्याबाबत मध्य रेल्वेद्वारे दिलगिरी व्यक्त करून प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापावर आणखी मीठ चोळते. परंतु, लोकल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार चालवणे मध्य रेल्वेला अद्याप शक्य झाले नसल्याची मिळालेल्या माहितीवरून सिद्ध झाले.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मध्य रेल्वेचा सरासरी वक्तशीरपणा ९४.९६ टक्के होता. परंतु, यावर्षी वक्तशीरपणा ९२.५५ टक्के इतका खाली घसरला आहे. मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणा ढासळत असल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे.
रेल्वे मार्गाची क्षमता पूर्ण झाल्याने सध्या धावत असलेल्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकत नाही, अशी बतावणी सातत्याने मध्य रेल्वेद्वारे केली जाते. परंतु, मध्य रेल्वेने वंदे भारत व इतर विशेष रेल्वेगाड्या वाढवून, उपनगरीय प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली.
नव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्याने दररोज लोकल नियोजित वेळापत्रकाच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावते. त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थानकात पोहोचण्यास विलंब होतो. कार्यालयात उशिरा पोहचल्याने, अनेकांच्या मासिक वेतनातून पैसे कापले जातात. त्यामुळे धक्काबुक्कीचा प्रवास करून, प्रवाशांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे.
लोकल विलंबाने धावत असल्याने एकाच लोकलमध्ये दोन ते तीन लोकलमधील प्रवाशांची गर्दी जमते. परिणामी, धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात.
”रोज मरे, त्याला कोण रडे”
- मध्य रेल्वेवरील एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९४.९६ टक्के होता.
- एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९४.९१ टक्के होता.
- एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९३.१० टक्के होता.
- तर, एप्रिल २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत सरासरी वक्तशीरपणा ९२.५५ टक्के आहे. यावर्षात प्रवाशांचा दैनंदिन प्रवास प्रचंड विलंबाने होत असला तरी, ”रोज मरे, त्याला कोण रडे” अशी अवस्था झाली आहे.
गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात सरासरी वक्तशीरपणा ९४.८९ टक्के होता. यावर्षी एप्रिल महिन्यात सरासरी वक्तशीरपणा ९३.९९ वर घसरला आहे. मे २०२४ मध्ये ९२.७९ टक्के तर, मे २०२५ मध्ये ९२.५३ टक्के सरासर वक्तशीरपणा नोंदविला आहे. गेल्यावर्षी जून आणि जुलै या पावसाच्या कालावधीत मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. त्यामुळे या दोन महिन्यात अनुक्रमे ८९.३० टक्के आणि ९१.२५ टक्के सरासरी वक्तशीरपणा होता.
परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसामुळे व्यत्यय कमी आल्याने जून २०२५ मध्ये ९२.५० टक्के आणि ९२.१९ टक्के सरासरी वक्तशीरपणाची नोंद झाली. त्यामुळे या दोन महिन्यात सुधारणा दिसून आली. असे असताना, ऑगस्ट २०२४ मध्ये ९३.७३ टक्के आणि ऑगस्ट २०२५ मध्ये ९२.५६ टक्के सरासरी वक्तशीरपणा नोंदविला. त्यामुळे गेल्या महिन्यात मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा पूर्णपणे ढासळला.
वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेची शक्कल
मध्य रेल्वेवरील वेळापत्रक कोलमडल्यावर, वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी मध्य रेल्वेद्वारे मोठी शक्कल लढवली जाते. मध्य रेल्वेवरील धीम्या लोकल या अर्धजलद किंवा जलद करून चालवण्यात येतात. त्यामुळे या लोकल त्यांच्या शेवटच्या स्थानकात नियोजित वेळेत पोहचतात. परंतु, यामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या गाड्यांसाठी थांबलेल्या प्रवाशांचे हाल होतात.