मुंबई: मध्य रेल्वेच्या विलंबामुळे प्रवासी त्रस्त आहेत. मात्र, मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला असून हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून ताशी १०० किमी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सीएसएमटी – पनवेल लोकल प्रवासासाठी एक तास २० मिनिटे, तर, ठाणे – वाशी लोकल प्रवासासाठी ३० मिनिटे लागतात. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून १०० केल्याने प्रवाशांच्या प्रवासातील १० मिनिटे कमी होतील. लोकलचा वक्तशीरपणा देखील वाढणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

हेही वाचा… मुंबई : कोट्यवधींच्या खजिन्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक

हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेल दरम्यानचा प्रवास वेगवान होईल. सीएसएमटी – टिळकनगर दरम्यानच्या दर दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर १ ते २ किमी आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकात लोकल थांबवून पुन्हा वेग कमी-जास्त करावा लागतो. मात्र टिळकनगर स्थानकानंतर दोन स्थानकांतील अंतर वाढते. त्यामुळे यादरम्यान लोकलचा वेग वाढवणे शक्य आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

हार्बर मार्गावरील लोकल सेवेचा वेग वाढल्याने दोन शहरांमधील वेळेचे अंतर कमी होईल. त्यामुळे नोकरदार वर्गाचा प्रवास वेळेत होईल, असे मत प्रवासी योगेश पवार यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway has decided to increase the local speed on harbor and trans harbor routes in mumbai dvr
First published on: 23-11-2023 at 15:19 IST