मुंबई : राज्याच्या पणन विभागाने केंद्र सरकारकडे तूर खरेदीसाठी वाढीव मुदत मागतली होती. प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
राज्याला हमीभावाने तूर खरेदीसाठी २ लाख ९७ हजार ४३० टनांचा कोटा मंजूर झाला होता. त्यासाठी २४ जानेवारीपासून शेतकरी नोंदणी सुरू झाली होती. प्रत्यक्ष खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. पहिल्यांदा तूर खरेदीला ९० दिवसांची मुदत होती, या ९० दिवसांत ६९,१८९ शेतकऱ्यांकडून १ लाख २ हजार ९५१ टन तूर खरेदी झाली होती. त्यानंतर सात मे रोजी केंद्राकडे तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने २८ मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. २८ मेपर्यंत १ लाख ३३ हजार ३१२ टन तूर खरेदी झाली होती. सरकारने दिलेल्या उद्दिष्टांपैकी ४४.८२ टक्के तूर खरेदी करण्यात नाफेड, एनसीसीएफला यश आले होते.
त्यानंतरही राज्यात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे तूर असल्यामुळे आणि बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्यामुळे तूर खरेदीला मुदतवाढ मिळवी, अशी मागणी २९ मे रोजी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. पण, अद्यापपर्यंत केंद्र सरकारकडून मुदतवाढीला परवानगी मिळालेली नाही. आता खरीप हंगामाची तयारी सुरू झाल्यामुळे खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.
तूर खरेदीची आकडेवारी
तूर खरेदीचे उद्दिष्टे – २ लाख ९७ हजार ४३० टन
२८ मेपर्यंत झालेली खरेदी – १ लाख ३३ हजार ३१२ टन
लाभार्थी शेतकरी संख्या – ८५,७७७
नोंदणी केलेले शेतकरी – १,३७,४९२