scorecardresearch

अतिवृष्टी झाल्यास निवडणूक कार्यक्रमात बदल; राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात ग्वाही

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

election
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यावरही अतिवृष्टी झाल्यास निवडणूक कार्यक्रमात बदल केला जाईल, अशी ग्वाही राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची भूमिका मान्य केली.  राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या पावसाळय़ानंतर घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची भूमिका आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात पाऊस जास्त होतो, असे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या आदेशाची प्रत आज संकेत स्थळावर उपलब्ध झाली.  निवडणूक प्रक्रिया लगेचच सुरू झाली आहे. पाऊस कमी होणाऱ्या भागातील निवडणुका घेण्याबाबत तयारी सुूरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करणारी अधिसूचना जारी झाल्यावरही अतिवृष्टी झाल्यावरही निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने दर्शविली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केली.

राज्य निवडणूक आयोगाच्या याचिकेनुसार महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका या सप्टेंबर- ऑक्टोबर तर जिल्हा परिषदांच्या निवडणुका या ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये घेण्याची योजना आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Changes election program case heavy rains state election commission testifies supreme court ysh