मुंबई: पूर्व आणि पश्चिम उपनगरे परस्परांशी जोडणाऱ्या चेंबूर – सांताक्रूझ जोडरस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून वाहनचालकांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास ताटकळत राहावे लागत आहे.
पनवेल, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जलदगतीने पश्चिम द्रुतगती मार्गावर पोहचता यावे यासाठी २०१४ मध्ये चेंबूर-सांताक्रूझ जोडरस्ता सुरू करण्यात आला. पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूरच्या छेडा नगरमधून या रस्त्याला सुरुवात होत असून लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला पूर्व, कुर्ला पश्चिम आणि संताक्रूज येथून हा मार्ग पश्चिम उपनगराला जोडतो. पनवेल, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, वांद्रे – कुर्ला संकुल, मुंबई विद्यापीठ, तसेच पश्चिम उपनगरातील विविध भागात पोहचण्यास सोयीस्कर झाले आहे.
मुंबई शहरातील पहिला दुमजली उड्डाणपूल याच मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उभारण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कुर्ला पश्चिम येथे होणारी वाहतूक कोंडी, मेट्रो आणि रस्त्याच्या कामांमुळे सध्या या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुरुवातीला चेंबूर येथून वांद्रे – कुर्ला संकुल येथे पोहचण्यास पाच ते दहा मिनिटांचा अवधी लागत होता. मात्र सध्या या ठिकाणी वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे हे अंतर अर्धा ते पाऊण तासांवर आले आहे. सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांच्या रांगा चेंबूरच्या छेडा नगरपर्यंत लागत आहेत.
कुर्ला आणि चेंबूरमधील वाहतुकीलाही फटका
चेंबूर – सांताक्रूझ जोड रस्त्यावरून सर्वाधिक वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरून पश्चिम द्रुतगती मार्गावर जातात. यासोबतच कुर्ला पूर्व आणि लोकमान्य टिळक हे अंतरही या मार्गामुळे कमी झाले आहे. कुर्ला पूर्व येथून लोकमान्य टिळक परिसर आणि लोकमान्य टिळक टर्मनिस येथे पोहण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. मात्र उड्डाणपुलामुळे हे अंतर अवघ्या दोन मिनिटांवर आले आहे. मात्र सकाळी कुर्ला आणि चेंबूरमधील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.