शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक प्रकरण असो किंवा महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भातील प्रकरणं असो भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या सातत्याने महिलांविरोधातील अत्याचारांवर आवाज उठवता दिसतात. नुकताच त्यांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवरच निशाणा साधलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमधील लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यावरुन चित्रा वाघ यांनी आता थेट केंद्रात सत्तेत असणाऱ्या त्यांच्याच पक्षाच्या सरकारला जाब विचारलाय. रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना टॅग करुन केलेल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केलीय.

मुंबईत रात्रीच्यावेळी लोकलनं प्रवास करताना महिला डब्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असणं बंधनकारक आहे. पण रात्री १० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित नसल्याची तक्रार करणारा एक व्हिडिओ महिला प्रवाशानं पोस्ट करत यासंदर्भात सोशल मीडियावरुन महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री, या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका”; शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप करत चित्रा वाघ यांची मागणी

याच व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी केंद्रीय मंत्र्यांना टॅग केलंय. “महिला मुलींवरचे वाढते हल्ले पहाता त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा उपयोग काय? मध्य रेल्वे का नाहीयेत पोलिस महिला डब्यात उत्तर द्या. कित्येक वेळा महिला मुलींवर हल्ले झालेत बऱ्याच जणींना जीव गमवावे लागलेत. रावसाहेब दानवे याची चौकशी व्हावी,” असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटखाली अनेकांनी चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच अनेकांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मध्य रेल्वेने अधिक सतर्क राहण्याची आणि जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केलंय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh slams central railway over womens security in mumbai local trains tagged raosaheb patil danve scsg
First published on: 17-03-2022 at 11:53 IST