मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा मानस व्यक्त केल्यावर आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने खासदार शरद पवार यांच्या निवृत्तीचा प्रस्ताव एकमुखाने शुक्रवारी फेटाळून लावला.

पक्षाच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात समितीची बैठक झाली. या बैठकीला सर्व १८ सदस्य उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी एकमुखाने पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नामंजूर केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ठरावाची माहिती पवार यांना देण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे काही नेते पवार यांना भेटण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’ येथे गेले. तेथे त्यांनी समितीने नामंजूर केलेल्या ठरावाची माहिती पवारांना दिली. पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी कायम राहावे, हीच समितीच्या सर्व सदस्यांची भावना आहे. त्यामुळे या भावनेचा आदर करून आणि कार्यकर्त्यांचा मान राखून पवार यांनी आपला राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी पटेल यांच्यासह समिती सदस्यांनी केली.

‘अंदाज चुकला’

अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यावर राज्यभर एवढी संतप्त प्रतिक्रिया उमटेल याची कल्पना आली नव्हती. आपला याबाबतचा अंदाज साफ चुकला, अशी कबुली शरद पवार यांनी दिली. लोकशाही व्यवस्थेत कार्यकर्त्यांच्या मताचा आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांचे प्रेम व विश्वास यामुळेच आपण निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार केल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यकर्ते आक्रमक : पवारांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय करण्याकरिता समितीच्या बैठकीच्या ठिकाणी कार्यकर्ते व महिला आक्रमक झाल्या होत्या. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. बैठक सुरू असताना पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी पक्षाच्या भिवंडी येथील कार्यकर्त्यांने पक्ष कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते व पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांला वेळीच आवरले. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.