मुंबई : गेल्या आठवडयाभरापासून वाढलेला उकाडय़ामुळे हैराण झालेल्या प्रवाशांचा  वातानुकूलित लोकल प्रवासाकडे कल वाढला आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलमधून ११ व १५ मार्च रोजी प्रत्येकी एक हजाराहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. विशेषत: मध्य रेल्वेवर सकाळी-संध्याकाळी धावणाऱ्या जलद लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या मुख्य मार्गावर १९ फेब्रुवारीपासून नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या सोडण्यात आल्या. अशा ३४ वातानुकूलित फेऱ्यांची भर पडली. यापूर्वी सीएसएमटी ते कल्याण मार्गावरच दहा वातानुकूलित लोकल फेऱ्यांची सेवा होती. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव या हार्बर मार्गावर १६ फेऱ्या चालवण्यात येत होत्या. नवीन फेऱ्यांमुळे एकूण वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६० झाली. १९ फेब्रुवारीला १४५ तिकिटांची आणि १३ पासची विक्री झाली होती. फेऱ्या आणि तिकीट, पास विक्री पाहता प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र गेल्या आठवडय़ापासून मुंबई व उपनगरात हळूहळू वाढत असलेल्या प्रचंड उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सामान्य लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना घामाच्या धारा लागत आहेत. उकाडा सहन होत नसल्याने काही प्रवाशांनी सामान्य लोकलऐवजी वातानुकूलित लोकल प्रवासाला पसंती दिली आहे. यातही पास काढण्यापेक्षा तिकीट काढण्यावरच प्रवाशांनी अधिक भर दिला आहे.

९ मार्चला ८७६ तिकीट आणि २४३ पासची विक्री झाली होती. ११ मार्चला यात वाढ होऊन १,०८० तिकिटांची आणि १५ मार्चला १,०६६ तिकिटांची विक्री झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.  पश्चिम रेल्वेवरही धावणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीची ९ मार्चला ४७१ तिकिटांची आणि ९४ पासची विक्री झाली होती. १० मार्चला १,१३३ तिकीट आणि २७७ पास, ११ मार्चला १,२०४ तिकीट आणि १९९ पासची विक्री झाली होती. १५ मार्चला यात आणखी वाढ झाली असून १ हजार ३५७ तिकीट आणि ४११ पास प्रवाशांनी खरेदी केल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळादरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांना चांगला प्रतिसाद आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी धावणाऱ्या काही जलद लोकल फेऱ्यांनाच गर्दी होत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली