मुंबई: गेली १३ वर्षे मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडले असून हा महामार्ग होळीपूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मुंबई – गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर, रायगड, रत्नागिरीसह अन्य भागांतील कोकणवासियांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईत १ जानेवारीपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एक हजार ७८५ जणांनी स्वाक्षरी केली असून ही मोहीम ठिकठिकाणी महिनाभर राबविण्यात येणार आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गाचे काम रखडले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची दुरवस्था होत असून खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होतात. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनतो. गणेशोत्सवकाळात गणेशभक्तांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. मुंबई – गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार शासनाने केला होता. मात्र येत्या होळीपूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासियांनी एकत्र येऊन मुंबई – गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीची स्थापना केली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ रविवारी बंद
या समितीतर्फे बैठकांचे आयोजन करून नागरिकांची मते जाणून घेण्यात येत आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येत आहे. समितीने मुंबई, ठाणे, पालघसह कोकण विभागात स्वाक्षरी मोहीम घेण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील दादर, भांडुप, परेल, सांताक्रुझ येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. बोरीवली, नालासोपारा, विरार, चारकोप येथे रविवार, ८ जानेवारी रोजी मोहीम घेण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पनवेल – इंदापूर मार्गाची अवस्था बिकट आहे. तर लांझा, चिपळूण, सिंधुदुर्गपर्यंत अशीच परिस्थिती आहे. या महामार्गाचे काम होळीपूर्वी पूर्ण करावे.
हेही वाचा >>> मुंबई : धावत्या लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू
ते शक्य नसल्यास शक्य तितक्या लवकर महामार्गाचे काम पूर्ण करावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा मुंबई – गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीचे संयोजक रुपेश दर्गे यांनी दिला आहे. गेल्या वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गावर १२९ प्राणांतिक रस्ते अपघातात १५० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२० मध्ये १०९ प्राणांतिक अपघातात १२३ जणांनी आणि २०२१ मध्ये ११८ प्राणांतिक अपघातात ११९ जणांनी प्राण गमावले आहेत.