मुंबई : पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ ला झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी सर्व १२ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. पण त्यावेळी या स्फोटांचा गुजरात दंगलीशी संबंध जोडण्यात आला होता. मुंबईत राहणाऱ्या गुजराती भाषिक नागरिकां लक्ष्य करण्यासाठी पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये हा स्फोट घडवण्यात आल्याचा दावा एका आरोपीने त्याच्या कबुलीजबाबात केला होता. संबंधीत कबुली जबाब पुरावा म्हणून न्यायालयापुढे सादर करण्यात आला होता.
मुंबई रेल्वे साखळी स्फोटांमध्ये शेख मोहम्मद अली आलम शेख याचा कबुली जबाब महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयापुढे सादर करण्यात आला होता. शेख हा प्रतिबंधीत स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) व त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच शेख हा पाकिस्तानातून घातपाती कृत्याचे प्रशिक्षण घेऊन आल्याचा दावाही करण्यात आला होता. त्याच्या जबाबानुसार, एप्रिल २००६ मध्ये त्याला वांद्रे पश्चिम येथे लकी हॉटेलजवळ बोलवण्यात आले होते. तेथून तो आरोपी फैजल शेखच्या घरी गेला होता. तेथे जमीर व पुण्याचा सोहेल शेख हे आधीपासून उपस्थित होते. त्यावेळी फैजलने प्रथम मुंबईतील गुजराती नागरिकांना लक्ष्य करायचे असल्याचे सांगितले.
तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये जास्त गुजराती भाषिक नागरिक प्रवास करत असल्यामुळे त्यांनी पश्चिम उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा निर्णय घेतला, असा दावा शेखच्या कबुली जबाबात करण्यात आला होता. आरोपत्रामध्येही हा कबुली जबाब समाविष्ट करण्यात ाला होता.
मुंबईकरांसाठी काळा दिवस
त्यानंतर ११ जुलै,२००६ चा मंगळवार मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान माटुंगा ते मिरा रोड दरम्यान सात बॉम्बस्फोट घडले. प्रथम श्रेणीच्या डब्यात घडवून आलेल्या या स्फोटांमध्ये १८६ जणांना मृत्यू झाला. त्यातील एक बॉम्ब ठेवणारा सलीम उर्फ ओसामा नावाचा पाकिस्तानी दहशतवादी याच स्फोटात ठार झाला होता, असा दावा पोलिसांकडून त्यावेळी करण्यात आला होता.
मोठा मानवी संहार
१९९३ च्या मुंबईतील साखळी स्फोटानंतर हा मुंबईतील मोठा मानवी संहार होता. त्यात २०९ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० जण गंभीर जखमी झाले होते. हे सर्व बॉम्बस्फोट प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये घडवून आणल्यामुळे स्फोटांमध्ये उच्च पदावर कार्यरत अधिकारी व व्यापाऱ्यांची संख्या अधिक होती. ११ मिनिटांच्या कालावधीत सात लोकलमध्ये हे ब़ॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. माटुंगा, माहिम, वांद्रे ते खार, खार ते सांताक्रुझ, जोगेश्वरी, बोरीवली व मिरा रोड ते भायंदर या दरम्यान सात स्फोट झाले.
सायंकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी या साखळी स्फोटांना सुरूवात झाली आणि ११ मिनिटांनी मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी संपूर्ण लोकल सेवा थांबली. स्फोटांची तीव्रता वाढवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. या स्फोटांमध्ये दोन पोलीस शिपायांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर एक आरोपी अॅन्टॉपहिल येथे चकमकीत मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता.