मुंबई : हृदयविकार हा फक्त प्रौढांचा आजार असल्याची समजूत धुळीस मिळाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लहानग्यांच्या हृदयावरही धोका वाढत चालला आहे. जन्मजात हृदयविकार (कंजनायटल हार्ट डिसिज) आणि जन्मानंतर विकसित होणारे हृदयाचे विकार दोन्हीही झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. लवकर होणारी लग्न, चुकीचा आहार, स्थूलत्व, ताण, मातृआरोग्याची कमतरता, मधुमेह व प्रदूषण हे प्रमुख कारणीभूत घटक असल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आकडेवारीनुसार २०१८ ते २०२३ दरम्यान राज्यात जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांच्या नोंदीत ४० टक्के वाढ झाली आहे. नागपूर, पुणे, मुंबई यांसारख्या शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी १० ते १२ हजार नवजात शिशूंमध्ये हृदयविकार आढळत आहेत. देशाच्या पातळीवरही परिस्थिती गंभीर आहे.
आयसीएमआरच्या २०२२ च्या इडिया स्टेल लेव्हल डिसिज बर्डन इनिशिएटिव्ह रिपोर्टनुसार देशातील दरवर्षी जन्मणाऱ्या २५ लाख बाळांपैकी लाखभर बाळांना जन्मजात हृदयविकार असतो. एम्स व फोर्टिसच्या २०२१ च्या संयुक्त अभ्यासानुसार भारतातील बालमृत्यूंपैकी जवळपास १० टक्के मृत्यूंचे कारण जन्मजात हृदयविकार आहे. ‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ (२०२०) मध्ये प्रकाशित अहवालानुसार ० ते १८ वयोगटातील हृदयविकारांमुळे भारतात दरवर्षी ८५ हजार मुलांचा मृत्यू होतो.
एनएचएम महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या २०१८ ते २३ चा विचार करता महाराष्ट्रातही बालह्रदयविकाराचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येते. आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ८,५०० बालकांची नोंद आहे. २०१९ मध्ये ९,३००, २०२० मध्ये १०,२००, २०२१ मध्ये ११,०००, २०२२ मध्ये ११,८०० तर २०२३ मध्ये १२,५०० बालकांना ह्रदयविकाराचा त्रास आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अर्थात लहान मुलांमधील ह्रदयविकार तसेच अन्य विविध आजारांची माहिती आरोग्य विभागाने शाळा शाळांमध्ये राबविलेल्या व्यापक आरोग्य तपासणी मोहिमेचे फलित असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
केईएम रुग्णालयातील ह्रदयविकार विभागाचे प्रमुख डॉ अजय महाजन यांना लहान मुलांमधील वाढत्या ह्रदयविकाराविषयी विचारले असता ते म्हणले, आता निदानाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लहान मुलांमधील ह्रदयविकारच्या त्रासाचे तात्काळ निदान होऊ शकते.
त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत शाळांमधील मुलांची व्यापक तपासणी होत त्यामुळे ही संख्या वाढल्याचे दिसून येते. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभाग लहान मुलांमधील आजारांच्या तपासणीसाठी अनेक योजना राबवते व त्यात अशी मुले आढळून येतात. परिणामी संख्या वाढल्यासारखे दिसते.
दुसरा भाग म्हणजे आदिवासी समाज तसेच तळागाळातील काही समाजात लवकर लग्न करण्यात येते. त्यातही नातेसंबंधांमध्ये लग्न झाल्यास जन्मला येणाऱ्या बाळात ह्रदयविकाराचे दोष दिसून येतात. त्याचप्रमाणे शहरांमध्ये शिकलेल्या मुली उशीरा लग्न करतात. यातील नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांमध्ये ताणतणाव, कमी झोप, कॉफी तसेच धुम्रपान आणि अल्कोहोल घेणार्या ज्या महिला असतात त्यांच्या जन्माला येणाऱ्या बाळात ह्रदयविकाराचा त्रास असल्याचेही दिसून येते असे डॉ अजय महाजन यांनी सांगितले.
जन्माला येणारे बाळ व्यवस्थित असावे यासाठी गरोदरपणात योग्य तपासण्या, लसीकरण, पोषणमूल्ययुक्त आहार, प्रसूतीदरम्यान दक्षता आणि जन्मानंतर नवजात तपासणी केली गेल्यास मोठ्या प्रमाणावर बालहृदय विकार टाळता येऊ शकतात. सतत श्वास घेण्यास त्रास, ओटीपोटात सूज, नीट वाढ न होणे, वारंवार थकवा येणे ही लक्षणे पालकांनी गांभीर्याने घ्यावे, असे तज्ज्ञांचे आवाहन आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अशा आजारांचे लवकर निदान व उपचार करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. भारताला “बालहृदय विकारांची राजधानी” होण्यापासून वाचवायचे असेल तर ग्रामीण भागात अधिक चांगल्या निदान सुविधा, प्रशिक्षित बालहृदय तज्ज्ञ व वेळेवर उपचार व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. तसेच पालकांमध्ये जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.