मुंबई : काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. आता राजकीय पक्षांची कार्यालये असलेली जागा परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकली असून हा व्यवहार रद्द करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केली. तसेच बाजारमूल्यापेक्षा कमी दरात ही जागा का विकली, असा सवालही केला आहे.
मंत्रालयासमोर काँग्रेस पक्षाचे ‘गांधी भवन’ हे कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची कार्यालये होती. मुंबई मेट्रो टप्पा- ३ चे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून दिले जाईल, असा शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र मेट्रो कॉर्पोरेशन व राज्य सरकारने त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला ३,४०० कोटी रुपयांना विकण्यात आली आहे, असे सावंत म्हणाले.
जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकारने राजकीय पक्षांची इथे फसवणूक केली आहे. सरकारच्या अशा फसवणुकीने जनतेचा जमीन अधिग्रहणवर विश्वास राहिलेला नाही. नरीमन पाईंट येथील या जागेचे बाजारमूल्य ५ हजार २०० कोटी रुपये आहे. परंतु ३ हजार ४०० कोटी रुपयांमध्ये व्यवहार करून १, ८०० कोटी रुपयांचे राज्य सरकारचे नुकसान झाले आहे. हा व्यवहार मनमानी तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ रद्द करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या संपूर्ण व्यवहाराचा पत्रव्यवहार दाखवला. काँग्रेस पक्षाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नरीमन पाईंट येथील जागीच पक्ष कार्यालय बांधून द्यावे, अन्यथा पक्ष न्यायालयात धाव घेईल, असा इशारा पाटील यांनी यावेळी सरकारला दिला.