मुंबई : कोकण किनारपट्टीवर गत आठवडाभर सतत पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे आणि थंडीच्या अभावामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे. आता पाऊस थांबला तर डिसेंबरमध्ये मोहोर येईल. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस यंदा मार्चअखेरीस बाजारत येण्याचा अंदाज आहे. हापूसचा हंगाम किमान महिनाभर लांबणीवर गेला आहे.
कोकण किनारपट्टीवर मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. भात पिकाचे नुकसान झाले. कापणीला आलेल्या शेतातील उभ्या भात पिकाला कोंब आले आहेत. त्यात भर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या कोकणातील हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. दरवर्षी पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरच्या मध्यापासून मोहोर येतो आणि नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर मोहोर येतो. पण, पावसामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर कुजला आहे. सततच्या पावसामुळे आंब्याच्या झाडावर बुरशी वाढली आहे.
चांगला मोहोर येण्यासाठी आंब्याच्या झाडाला किमान महिनाभर पाण्याचा ताण बसावा लागतो (जमीन कोरडी व्हावी लागते) तसेच थंडीत वाढ व्हावी लागते. मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर ऑक्टोबरपासून किनारपट्टीवर थंडीचे प्रमाण वाढते. दिवसा ऑक्टोबरचा हीट म्हणजे उन्हाच्या झळा आणि रात्री थंडी, असे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नोव्हेबरच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर मोहोर येण्यास सुरूवात होते. यंदा आजअखेर तळकोकणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे आंब्याच्या बागांमध्ये अद्याप चिखल आहे. आता पाऊस थांबला तरीही मोहोर येण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे.
थंडी पडलीच नाही तर काय होणार
चांगला मोहोर येण्यासाठी झाडांना पाण्याचा ताण मिळणे. थंडीत वाढ होणे, मतलई वारे सुरू होण्यासह तापमान १७ – २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. यंदा सततच्या पावसामुळे हे नैसर्गिक वातावरण तयार झाले नाही. आता पाऊस थांबला तरीही चांगला मोहोर येण्यास डिसेंबर महिना उजाडेल. फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस यंदा मार्चअखेरीस बाजारात येईल. हापूस हंगाम किमान महिनाभर लांबणीवर जाणार आहे, अशी माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेता सहकारी संघाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी दिली.
