मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ६८५० रुपयांना टॅब खरेदी करण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला असला तरी प्रत्यक्षात या टॅबची किंमत साडेतीन हजार रुपये आहे. तसेच शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांच्या ‘व्हिडीओकॉन’ कंपनीचे पडून असलेले टॅब महापालिकेच्या गळी उतरविण्यात आले असून, या साऱ्या व्यवहारात ‘मातोश्री’चा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप करीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला.
टॅबचा विषय गाजत असताना महापालिकेच्या स्थायी समितीत काँग्रेस व अन्य विरोधकांचा विरोध झुगारून ३२ कोटी रुपयांचे सुमारे २८ हजार टॅब खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ‘व्हिडीओकॉन’ कंपनीकडून प्रत्येकी ६८५० रुपये दराने हे टॅब खरेदी करण्यात आले. बाजारात यापेक्षा अत्याधुनिक टॅब साडेतीन हजारांमध्ये उपलब्ध आहेत. एवढय़ा जादा दराने टॅब का खरेदी करण्यात आले, असा सवाल निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला. या साऱ्या खरेदीत ‘मातोश्री’चा हात असून, पिता की पुत्राने या खरेदीत रस घेतला हे बाहेर आले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगाविला.
दोन वर्षांकरिता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ३२ कोटी रुपयांचे टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. भविष्यात सर्व साडेतीन लाख विद्यार्थ्यांना हे टॅब देण्याची योजना आहे. तसे झाल्यास पालिकेवर २३९ कोटींचा बोजा पडेल. आदित्य हे ‘व्हिडीओकॉन’ कंपनीचे विक्रेते (सेल्समन) आहेत का, असा सवालही निरुपम यांनी केला. टॅब खरेदीकरिता तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. या तिन्ही कंपन्यांनी आपापसात ठरवून (िरग) सारे केले होते. हे काम मिळालेली ‘टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स’ ही व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याची माहिती निरुपम यांनी
दिली.
प्रदीप धूत व कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’ला अलीकडच्या काळात वारंवार भेटी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2015 रोजी प्रकाशित
मुंबई महापालिकेच्या टॅब खरेदीत घोटाळा
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ६८५० रुपयांना टॅब खरेदी करण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला असला...

First published on: 08-08-2015 at 03:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corruption in bmc tab buying