लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत १४ हजार उपकरप्राप्त इमारतींसह इतर हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. हा पुनर्विकासाचा प्रश्न कसा मार्गी लावावा, पुनर्विकासातील अडचणी कोणत्या आणि त्या कशी दूर कराव्यात याबाबत मार्गदर्शन आणि विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी, सहकारी गृहनिर्माण संस्थांना मदत करण्यासाठी क्रेडाई-एमसीएचआय या विकासकांच्या संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पुनर्विकासासंबंधीचे दुसरे प्रदर्शन क्रेडाई-एमसीएचआयने आयोजित केले आहे. त्यानुसार १२ एप्रिलला, शनिवारी, वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

५००० हून अधिक गृहनिर्माण संस्थांचा सहभाग

पुनर्विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी क्रेडाई-एमसीएचआयने सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवश्यक ती मदत, मार्गदर्शन करण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये पुनर्विकासासंबंधीचे पहिले प्रदर्शन भरविले होते. यात मोठ्या संख्येने गृहनिर्माण संस्था सहभागी झाल्या होत्या. आता क्रेडाई-एमसीएचआयने दुसऱ्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. त्यानुसार शनिवारी, १२ एप्रिलला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील लोटस हॉल १ आणि २ मध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन विविध सत्रांमध्ये पार पडणार आहे.

पहिल्या प्रदर्शनात ३००० गृहनिर्माण संस्थांनी नोंदणी केली होती. तर प्रत्यक्षात २००० संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी ही संख्या वाढेल आणि ती ५००० च्या घरात जाईल असा विश्वास क्रेडाई-एमसीएचआयला आहे. या प्रदर्शनात म्हाडा, मुंबई महानगर पालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासारख्या (एमएमआरडीए) सरकारी यंत्रणांही सहभागी असणार आहेत. त्यात मोठ्या संख्येने विकासक, वास्तुविशारद, नियोजनकार, वित्तीय संस्था आणि कायदेतज्ज्ञही सहभागी होणार आहेत. त्यामुळे संस्थांना पुनर्विकासासंबंधीचे सर्व प्रकारचे मार्गदर्शन तेथे केले जाणार असून त्यातून पुनर्विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास क्रेडाई-एमसीएचआयने व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुनर्विकास हा आता पर्याय राहिला नसून मुंबईच्या भविष्याचा विचार करता तो आवश्यक भाग झाला आहे. अशावेळी पुनर्विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती. ते व्यासपीठ क्रेडाई-एमसीएचआयने पुनर्विकासासंबंधीच्या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध करुन दिले असून याचा मोठा फायदा संस्थांना होणार असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष डोमनिक रोमेल यांनी दिली. तर या प्रदर्शनाला अधिकाधिक गृहनिर्माण संस्थांनी उपस्थित राहत आपल्या वसाहतीचा, इमारतीचा पुनर्विकासाचा मार्ग सुकर करावा असे आवाहन क्रेडाई-एमसीएचआयकडून करण्यात आले आहे.