मुंबई : पवईतील आयआयएमजवळ बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गुरुवारी मगर आढळली. बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजुरांनी या मगरीला पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पाहिल्यावर तिची सुटका करण्यासाठी तात्काळ बचाव पथकाला पाचरण करण्यात आले. मगरीला खड्ड्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढून निसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

पवईतील आयआयएम परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या एका खड्ड्यात ‘मार्श’ प्रजातीची मगर अडकली होती. बांधकामच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना ही मगर दिसली. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ याबाबत वाइल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेला माहिती दिली. त्यानंतर तेथे वाइल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन आणि वन विभागाचे अधिकारी दाखल झाले. वन विभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने वाइल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनचे राज जाधव, प्रीतम सावंत, सागर साळवी, प्रसाद खांडागळे आणि सायथन आवडे या सदस्यांनी मगरीला खड्ड्यातून बाहेर काढले. मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीअंती मगर पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर वन विभागाच्या देखरेखीखाली मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

दरम्यान, पवई तलावात मगरींचा अधिवास आहे. अनेकदा मगरी तलावाच्या काही भागांत सहजपणे दिसतात. तसेच आयआयटी मुंबई परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेकदा मगरी विहार करताना दिसल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा मगरी तलावाबाहेर येतानाही दिसतात. त्या प्रामुख्याने आयआयटी मुंबई आणि रेनिसंस हॉटेलच्या परिसरात दिसतात.

सर्वेक्षण करण्याची मागणी

पवई तलावात मोठया प्रमाणात मगरींचा अधिवास असून अधूनमधून मगरी तलावाबाहेर येऊन मुक्तसंचार करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी परिसरात मगरीचे पिल्लू दिसले होते. यामुळे सध्या तलावातील मगरींचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक, तसेच पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. यापूर्वी पालिकेने २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात पवई तलावात साधारण १८ प्रौढ मगरी असल्याचे निदर्शनास आले होते. आयआयटी, मुंबई, रेनिसंस हॉटेल, पवई उद्यानाजवळ पवई तलावात मगरींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. तसेच तलावातील छोट्या उंचवट्यावर अधूनमधून मगरींचे दर्शन घडते. पवई तलावातील मगरींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदा गणना केली होती.

यापूर्वीही मगरीची सुटका

मागील वर्षी पवई येथील मोरारजी नगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळील ५ फूट खोल खड्ड्यात सुमारे पाच फुटी मगर आढळली होती. रेस्क्यूइंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअर या प्राणी संघटनेचे कार्यकर्ते आणि विन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मार्श’ प्रजातीच्या ४.६ फूट लांबीच्या नर मगरीची सुटका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तस्करीचा प्रयत्न

पवई तलावात मगरींचा अधिवास असून अनेकदा मोठ्या मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी आरोपीने तस्करी केलेले मगरीचे पिल्लू आयआयटी पवई परिसरात विक्रीसाठी आणले होते. काही जण मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी या परिसरात येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयआयटी पवईच्या प्रवेशद्वारासमोर जोगेश्वरी जोडरस्त्यावर वन विभागाने सापळा रचला होता. संशयास्पद व्यक्ती दिसताच वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मगरीचे पिल्लू सापडले होते.