मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज सरासरी ११ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. पुढील महिन्यात कुलाबा-सीप्झ-वांद्रे हा मुंबई भुयारी मेट्रो मार्ग ३ खुला करण्यात येणार आहे. या मार्गात सीएसएमटी हे स्थानक येणार आहे.

मेट्रोने कुलाब्यावरून सीएसएमटीत उतरणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना रेल्वे स्थानकात जाणे सोयीस्कर झाले आहे. सीएसएमटी येथील सबवेत भुयारी मार्ग तयार केला असून, रेल्वे आणि मेट्रो भुयारी मार्गाने जोडली गेली आहे. अत्याधुनिक यंत्रणेने बनलेल्या भुयारी मार्गामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास सुकर होईल.

फोर्ट परिसरात महापालिका, मंत्रालय, महापालिका, बँका, मोठ्या बाजारपेठा, बंदरे, शासकीय व खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड वर्दळ असते. पुढील महिन्यात मेट्रो – ३ ची सेवा सुरू झाल्यास गर्दीचा लोंढा वाढणार आहे. कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट या परिसरातील प्रवासी सीएसएमटी गाठण्यासाठी टॅक्सी, बस किंवा पर्यायी वाहनांचा वापर करतात.

परंतु, मेट्रो – ३ सुरू झाल्यास कफ परेड, विधान भवन, चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक या स्थानकातून सीएसएमटी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल. एकाचवेळी गर्दी होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यावर उपाय म्हणून गर्दीचे विभाजन करण्यासाठी सीएसएमटी येथील सबवेमध्ये मेट्रो – ३ चा भुयारी मार्ग जोडण्यात आला आहे.

पूर्वी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना रस्ता ओलांडून यावे लागत होते. त्यामुळे वाहनांना आणि प्रवाशांना दोघांना प्रवास करताना अडचणी येत होत्या. त्यानंतर या ठिकाणी सबवे तयार करून, हजारीमल सोमाणी मार्ग, महापालिका मार्ग आणि दादाभाई नौरोजी मार्गाजवळ आणि सीएसएमटी स्थानकाजवळ प्रवेशद्वार केले आहेत.

मात्र गर्दीच्यावेळी या भुयारी मार्गात प्रचंड वर्दळ असते. तसेच फेरीवाल्यांनी हा भुयारी मार्ग व्यापल्याने प्रवाशांना येथून चालणे कठीण होते. हिमालय पुलावर देखील प्रवाशांची प्रचंड धावपळ सुरू असते. मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील गर्दीचा लोंढा थेट सीएसएमटी परिसरात वाढणार आहे. त्यामुळे सबवे मार्गातील भुयारी मार्गामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल.

  • या भुयारी मार्गाची लांबी १२० मीटर आणि रुंदी ६.५ मीटर आहे.
  • दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्ट आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे.
  • भुयारात हवा खेळती राहण्यासाठी एचव्हीएसी (हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) प्रणाली बसवण्यात आली आहे.
  • सुरक्षा व्यवस्था म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
  • प्रवासासाठी सबवे मार्गे इतर मार्ग खुले झाले आहेत.
  • हा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी मेट्रोच्या उद्घाटनानंतर सुरू होईल.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो ३ मार्गिकेचा उर्वरित आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या अंतिम टप्प्याचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचा शुभारंभ येईल. कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या १३ किमी मार्गाचे लोकार्पण ७ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले.

त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा १० मे २०२५ पासून नागरिकांसाठी खुला झाला. आतापर्यंत २२ किमी मेट्रो सुरू झाली आहे. तर, वरळी ते कुलाबा दरम्यानचा अखेरचा टप्पा लवकरच प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकारक होणार आहे.