मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीत बांधण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कंत्राटदाराच्या माध्यमातून वृक्षतोडीस सुरुवात झाली आहे. मात्र ही वृक्षतोड बेकायदा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कारशेडच्या नावाखाली मिरा-भाईंदरमधील प्राणवायूचा महत्वाचा स्त्रोत असलेला परिसर नष्ट केला जात असल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे बेकायदा वृक्षतोड तात्काळ थांबवावी आणि डोंगरी कारशेड रद्द करून ती इतरत्र हलवावी यासाठी स्थानिकांनी आंदोलन तीव्र केले आहे. रविवारी डोंगरी आणि आसपासच्या गावातील लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत मानवी साखळी आंदोलन केले.
म्हणून कारशेडला विरोध
मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केल्याने कारशेड डोंगरी येथे हलविण्यात आली. मात्र डोंगरी कारशेडलाही स्थानिकांकडून विरोध होत आहे. डोंगर, जंगल नष्ट करत कारशेड उभारली जाणार आहे. या डोंगरावर औषधी वनस्पती, दुर्मीळ आणि संरक्षित पक्षी, प्राणी, फुलपाखरे, कीटक, साप यांचे वास्तव्य आहे.
नैसर्गिक ओढे, झरे धबधबे असून ग्रामस्थांनी छोटे धरणही बांधले आहे. त्यावर शेती अवलंबून आहे. त्यामुळे डोंगरी कारशेड रद्द करण्याची मागणी स्थानिकांची आहे. या मागणीसाठी मागील कित्येक महिन्यांपासून स्थानिक आंदोलन करत आहेत. मात्र राज्य सरकार, एमएमआरडीए आणि स्थानिक प्रशासन याकडे साफ काणाडोळा करत आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता आंदोलन तीव्र केले आहे.
न्यायालयीन लढाईची तयारी
डोंगरी कारशेडसंबंधीच्या सूचना-हरकतींच्या सुनावणीसंबंधीचा शासन निर्णय अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. असे असताना डोंगरी येथे वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली आहे. १२ हजारांहून अधिक झाडे यासाठी कापली जाणार आहेत. ही झाडे कापताना क्रमांक नसलेली झाडे कापली जात असून झाडांच्या वयाबाबतही गोंधळ घालण्यात आलेला आहे. त्यामुळे ही वृक्षतोड बेकायदा असल्याचे म्हणत स्थानिकांनी वृक्षतोड त्वरीत थांबवावी आणि कारशेड रद्द करावी या मागणीसाठी रविवारी सकाळी ९ ते ११ या दरम्यान मानवी साखळी आंदोलन केले.
त्यात डोंगरी, उत्तन, पाली,चौक, तारोडी, मोर्वा, राई, मुर्धा,गोराई, मनोरी, भाईंदरमधील स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल येत्या काही दिवसात घेतली नाही तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू अशी माहिती यावेळी डोंगरीतील स्थानिक आणि माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी दिली.