मुंबई : आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पडले. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
व्यापाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करून भरभराटीसाठी प्रार्थना केली. तसेच घरोघरी पूजा करण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारीच अचानक पाऊस सुरू झाल्याने खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. गृहसंकुलात लावलेले आकाशकंदील, बच्चेकंपनीने बनविलेले किल्ले भिजले. सकाळपासून वातावरणात उत्साह होता. पावसाची शक्यता नव्हती. त्यामुळे सर्वत्र जल्लोष होता. मात्र, अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठांमध्ये शांतता होती. सायंकाळी उशिरा पाऊस थांबल्यावर नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मात्र रस्त्यांवर पाणी, असल्याने फटाक्यांचा जोर कमीच होता. पाऊस असला तरी मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साथीने चाळीत व इमारतीत दीपोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धाही रंगल्या होत्या.
बदलापुरात ढगफुटीसदृश पाऊस
बदलापूर, ठाणे: ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दिवाळीच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले. बदलापुरात ढगफुटी सदृश पाऊस पडला. एक तासात १०१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे आणि कांदिलांचे नुकसान झाले. बदलापूर येथील काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
तापमानात घट होण्याचा अंदाज
मुंबईत काही दिवसांपासून तापमान ३३-३५ अंशापर्यंत नोंदले जात आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.४ अंश सेल्सिअस, तर, सांताक्रूझ केंद्रात ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईतही पुढील दोन – तीन दिवस पावसाची शक्यता असल्याने तापमानात घट होऊन दिलासादायक वातावरण अनुभवता येईल.
कोकणालाही तडाखा
अलिबाग: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मंगळवारी जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. भातकापणीचा हंगाम सुरू असल्याने पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.