मुंबई : मुंबईतील बहुतांशी सगळ्या गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे शनिवार, ६ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार असले तरी दक्षिण मुंबईतील एक गणेशमूर्ती अशी आहे जिचे विसर्जन होणार नाही. मूर्तीवर जलाभिषेक करून ही मुर्ती पुन्हा चौपाटीवरून मंडपातच नेली जाणार आहे. हीच मूर्ती पुढच्या वर्षी नव्या स्वरुपात वापरली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवात गिरगावातील सुतारगल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने एक नवीनच प्रयोग यंदा केला आहे.

शनिवारी अनंत चतुर्दशी असून मुंबईतील बहुतांशी सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पार पडणार आहे. मात्र दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील सी. पी. टॅंक परिसरातील पहिली सुतारगल्ली येथील गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती याला अपवाद असेल. या मूर्तीचे उद्या समुद्रात किंवा कुठेही जलस्रोतात विसर्जन होणार नाही. तर ही मूर्ती पुन्हा मंडळात नेली जाणार असून तीच मूर्ती पुढच्या वर्षी वापरली जाणार आहे. पीओपी आणि पर्यावरणपूरक मूर्तींच्या न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर या मंडळाने यंदा फायबरची मूर्ती स्थापन केली आहे. तब्बल ३९ फूट उंच असून ती हुबेहूब पीओपीच्या मूर्तीसारखी दिसते.

फायबरची मूर्ती आणून तिचा पुनर्वापर करण्याच्या या प्रयोगाबद्दल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी सांगितले की, सुतारगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे ६४ वर्षे जुने असून या मंडळाची उंच मूर्तीची परंपरा आहे. दरवर्षी मंडळाची पीओपीची मूर्ती तब्बल ३५ ते ४० फूटाच्या दरम्यान असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पीओपी बंदीचा विषय सुरू असून हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे.

आताही न्यायालयाने पीओपी मुर्तींना परवानगी दिलेली असली तरी ती केवळ माघी गणेशोत्सवापर्यंत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी पुन्हा मूर्ती कोणत्या माध्यमातील हवी हा वाद येणारच आहे. त्याचबरोबर पीओपीच्या मूर्तीमुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. तसेच विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मूर्तींचे अवशेष समुद्र किनाऱ्यावर येतात. त्यामुळे आम्ही पीओपीला पर्याय शोधत होतो. त्यातून फायबरच्या मूर्तीचा पर्याय पुढे आल्याच सांगळे यांनी सांगितले.

खर्चही वाचणार

मंडळाला दरवर्षी पीओपीच्या मोठ्या मूर्तीसाठी तब्बल साडेचार ते पाच लाख खर्च येतो. यंदा फायबरच्या मूर्तीसाठी मंडळाला सुमारे आठ लाख खर्च आला आहे. मात्र ही मूर्ती पुढील तीन-चार वर्षे वापरता येणार आहे. त्यामुळे हा खर्च तीन ते चार वर्षांसाठी असेल. दरवर्षी केवळ मूर्तीला रंगरंगोटी करणे, मूर्तीचे अवशेष नवीन स्वरुपात जोडणे हे बदल करून मूर्ती नव्या रुपात सादर करण्यात येणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले. मूर्तीची प्रभावळ किंवा बैठक बदलून मूर्तीमध्ये वेगळेपणा आणला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूजेच्या मूर्तीचेच विसर्जन

मंडळाने स्थापन केलेली ही ३९ फूटाची फायबरची मूर्ती विसर्जन न करताच पुन्हा मंडळात आणली जाणार आहे. मात्र मंडपातील पूजेची छोटी मूर्ती विसर्जित केली जाणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले. मंडळाने पोलिसांशीही या विसर्जनाबाबत चर्चा केली असून मूर्ती पुन्हा परत आणली जाणार असल्यामुळे यंदा मंडळाची विसर्जन मिरवणूक लवकर निघणार असून लवकर परतणार आहे. मंडळाचा हा प्रयोग मुंबईतील गणेशोत्सवाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे.