लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यामध्ये स्त्री – पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन वरळीतील बी. डी. डी. चाळ (११६ व ११८) येथील समाज कल्याण विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ’शैक्षणिक मार्गदर्शन मोहीम’ राबविली. गावखेड्यातून चैत्यभूमीवर आलेल्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक योजना आणि अभ्यासक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

देशभरातील नामांकित शिक्षण संस्था आणि संबंधित संस्थांमधील अभ्यासक्रम, विविध शिष्यवृत्ती, फेलोशिप, पदवी शिक्षणानंतरचे उच्च शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणविषयक माहिती, विविध ठिकाणी असणारी वसतिगृहे आदी शैक्षणिकविषयक माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना देण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शन मोहिमेला चैत्यभूमी परिसरात दाखल झालेल्या विद्यार्थी व पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शासकीय वसतिगृहातील सुमारे ६० ते ७० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले.

आणखी वाचा-बुडालेल्या ठेवी परत मिळण्याची शक्यता! न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर शासनाकडून परिपत्रक जारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. यामध्ये विद्यार्थ्यांचीही संख्याही मोठा मोठी असते. मात्र काही विद्यार्थी विविध शैक्षणिक योजना आणि अभ्यासक्रमांसंदर्भात अनभिज्ञ असतात. त्यामुळे शिक्षणविषयक माहिती तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून चैत्यभूमीवर राबविण्यात येत आहे. या उपक्रमामधून माहिती मिळवून गेल्यावर्षी सुमारे २५० विद्यार्थी मुंबईत शिक्षणासाठी दाखल झाले असून त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला’, असे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सांगितले.