झोपडीत मूळ मालक राहत नसल्यास पात्रता रद्द होणार!

झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी मुख्यमंत्री स्वत: प्रयत्नशील आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

निशांत सरवणकर, मुंबई

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पात्र ठरलेल्या झोपडीधारकाऐवजी संबंधित झोपडीत मूळ मालकाऐवजी अन्य व्यक्ती राहत असल्याचे आढळल्यास मूळ झोपडीधारकाची पात्रताच रद्द करण्याचे आदेश आता प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. यामुळे अशी झोपडी अपात्र ठरवून ती थेट पाडण्याचे आदेश प्राधिकरणाला मिळणार आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ‘डमी’ झोपडीधारकांकडून होणारा अडथळा आता दूर होऊन अनेक रखडलेल्या योजना मार्गी लागणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्य शासनाने ‘एक झोपडी, एक व्यक्ती‘ हे धोरण प्रभावीपणे अमलात आणण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक योजनांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र इरादा पत्र जारी होऊनही योजना मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे आढळून आले आहे. झोपडीधारकांची पात्रता यादी (परिशिष्ट दोन) संबंधित योजना ज्या भूखंडावर आहे त्या यंत्रणेला जारी करावी लागते. ही यादी मिळाल्यानंतर विकासक झोपडपट्टी योजना सादर करतो. योजना मंजूर झाल्यावर इरादा पत्र जारी केले जाते. त्यानंतर झोपडी पाडण्यास सुरुवात केली जाते. ही कारवाई करताना अनेक योजनांमध्ये झोपडीधारकांकडून झोपडी पाडण्यात अडथळे निर्माण केले जातात. विरोध करणारे झोपडीधारक हे पात्रता यादीतील रहिवासी नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक योजनांत असे झोपडीधारक १५ ते ५० टक्के असल्याचे आढळून आले आहे. हे ‘डमी’ झोपडीधारक या झोपडीवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. त्यामुळे योजनांना विलंब लागत असे. त्यामुळे मूळ झोपडीवासीऐवजी अन्य कोणी आढळल्यास संबंधित झोपडीवासीयाला अपात्र करण्यात आले तर झोपडी भाडय़ाने देण्याचे वा विकण्याचे प्रकार कमी होतील आणि या योजनेत खराखुरा झोपडीवासीय लाभार्थी ठरेल, अशा रीतीने धोरण तयार करण्याचे प्रस्तावित होते. ते अखेर तयार झाले असून तशा सूचना राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता पात्र ठरल्यानंतर झोपडय़ा विकणारे वा भाडय़ाने देणाऱ्या झोपडीधारकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश प्राधिकरणाला मिळाले आहेत. हे ‘डमी’ झोपडीधारक प्राधिकरणासाठी डोकेदुखी ठरले होते.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी मुख्यमंत्री स्वत: प्रयत्नशील आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणाही विकास आराखडय़ात करण्यात आल्या आहेत. आता या नव्या सुधारणेमुळे योजनांमध्यी डमी झोपडीधारकांचा अडथळा दूर होईल, अशी आशा आहे.

– दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eligibility will be canceled if the original owner does not live in the hut

ताज्या बातम्या