मुंबई : राज्य कामगार विमा सोसायटीअंतर्गत (ईएसआयएस) असलेल्या दवाखान्यांसाठी पोर्टेबल हँडेड क्ष किरण यंत्रे खरेदी करण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या सूचना डावलून ईएसआयएसकडून चढ्या दराने यंत्रे खरेदीचा घाट घालण्यात आला आहे. जेम या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेनुसार ६० यंत्रांसाठी २३ कोटी ४० लाख रुपये अंदाजित खर्च दाखविण्यात आला आहे.
ईएसआयएसच्या रुग्णालयात येणाऱ्या क्षयरोग रुग्णाची तातडीने तपसाणी करण्यासाठी, तसेच खोकला झालेला रुग्णाला ब्रोंकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार झाले आहेत का याची तपासणी करून त्यावर पुढील उपचार करणे सुलभ व्हावे यादृष्टीकोनातून ईएसआयएसच्या १११ पैकी ६० दवाखान्यांमध्ये पोर्टेबल क्ष किरण यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोसायटीने यंत्र खरेदीसाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली होती. या समितीला दिलेल्या तपशीलानुसार पोर्टेबल क्ष किरण २५ लाखांपर्यंत खरेदी करण्यात यावे अशी शिफारस केली होती.
मात्र ही यंत्रे केंद्र सरकारच्या जेम संकेतस्थळावरून खरेदी करताना सोसायटीकडून समितीने सूचविलेल्या किमतीपेक्षा १४ लाख रुपये अधिक दराने म्हणजेच ३९ लाख रुपयांना खरेदी करण्यासंदर्भातील निविदा १४ जुलै रोजी काढण्यात आली आहे. त्यामुळे एकूण अंदाजित किमतीपेक्षा जवळपास ८ कोटी ४० लाख रुपये अधिक दराने ही यंत्रे खरेदी करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ही खरेदी एकत्रित निविदा पद्धतीने (बंच बीड) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही उपकरणे प्रत्यक्ष बनविणाऱ्या कंपन्या या निविदा प्रक्रियेतून बाहेर फेकल्या गेल्या असून, फक्त वितरकांनाच यामध्ये सहभागी होता आले आहे. त्यामुळे उपकरणे चढ्या भावाने घेण्याचा घाट घातल्याचे निदर्शनात येत असल्याचे ईएसआयएसमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तसेच क्ष किरण खरेदीसाठी क्ष किरणतज्ज्ञांकडून तपशील घेण्याऐवजी कान-नाक-घसा तज्ज्ञाकडून घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तांत्रिक सल्लागारांच्या शिफारशी बाजूला सारून निर्णय घेण्यात आला असून हा प्रकार संशयास्पद असल्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
काय आहे प्रशासनाचे म्हणणे…
तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशीनसुारच क्ष किरण यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. समितीने दिलेल्या किंमती पडताळून पाहण्यासाठी जेम संकेतस्थळावर तपासणी केली असता दिल्लीतील ईएसआयएसच्या रुग्णालयाने ५० लाख रुपयांना ही यंत्रे खरेदी केल्याचे निदर्शनास आले. मात्र समितीने दिलेल्या किमती कमी असल्याचे निदर्शनास आले.
क्षयरोगाबरोबरच दवाखान्यात खोकला झालेल्या रुग्णाला छातीमध्ये संसर्ग, ब्रोंकायटिस किंवा न्यूमोनिया झाला आहे का हे तपासून त्याला प्रतिजैविके देण्याऐवजी साधारण औषधे देता यावीत. तसेच ग्रामीण भागात घेण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये लोकांची तपासणी करता यावी, या अनुषंगाने ही यंत्रे खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय संचालक डॉ. शशी कोळणूकर यांनी दिली.