मुंबई : सरकारी नोकरीत भरती करून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये विशाल कांबळे (३५), साहिल गायकवाड (२०) आणि प्रकाश भालेराव (४०) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार व्यावसायिक असून चेंबूर म्हाडा कॉलनी येथे आहेत. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे की विशाल कांबळे याने पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदाराच्या पतीस प्राप्तिकर विभागात नोकरी मिळवून देतो असे सांगून विविध वेळेस एकूण आठ लाख रुपये घेतले. मात्र नोकरी न लावता तसेच रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक करण्यात आली.

आरोपी प्रकाश भालेराव हा बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्र तयार करत असल्याचा आरोप आहे. त्याने इतर आरोपींना बनावट कागदपत्र दिले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज, अंमलदार देसाई, व कर्मचारी यांनी आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले व गुप्त बातमीदाराच्या मदतीने चुनाभट्टी परिसरातून मास्टरमाइंड प्रकाश भालेरावला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाला असून त्यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या टोळीने केवळ प्राप्तिकर विभागात नाही तर भारतीय टपाल, महापालिका, रेल्वे यांसारख्या सरकारी विभागात नोकरी लावून देतो, असे सांगून अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय आहे. या आरोपींकडून बनावट नियुक्ती पत्र अथवा कागदपत्रे घेतली असतील, तर गुन्हे शाखा कक्ष ६, ला संपर्क करण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे.