मुंबई : भारताच्या जी- २० अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक उद्या, मंगळवारपासून तीन दिवस मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. सदस्य राष्ट्रांचे १०० हून अधिक प्रतिनिधी, काही राष्ट्रांचे निमंत्रित या कार्यगटाच्या बैठकीला उपस्थित राहतील. मुंबईत होणाऱ्या या दुसऱ्या परिषदेच्या निमित्ताने मोक्याच्या ठिकाणी रोषणाई आणि झगमगाट करण्यात आला आहे.

जी – २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस मुंबईत होत आहे. यापूर्वी मुंबईत गेल्या डिसेंबरमध्ये वित्तीय कार्यगटाची बैठक झाली होती. ही दुसरी बैठक आहे. या बैठकीच्या उद्घाटनाला केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी व्यापार आणि वित्तीय सहकार्य यावर आंतरराष्ट्रीय परिषद होईल. व्यापार आणि वित्तपुरवठा यातील तफावत कमी करण्याकरिता बँका, वित्तीय संस्था, विकास वित्तीय संस्था, निर्यात पतसंस्था यांची भूमिका, डिजिटलीकरण यावर चर्चा करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीच्या ठिकाणी भारतीय चहा, कॉफी, मसाले मंडळांकडून प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी व्यापार वाढ, लघू आणि मध्यम उद्योग, तंत्रज्ञान या विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या विदेशी प्रतिनिधींना भारत डायमंड बोर्स या हिरे व्यापारी केंदाची सफर घडविली जाणार आहे. जी -२० परिषदेच्या निमित्ताने मुंबईत जागोजागी फलक लावण्यात आले आहेत. मंत्रालयापासून ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्ह परिसरातही रोषणाई करण्यात आली आहे.