मुंबई: विमा कंपनीचा हप्ता भरण्यात सवलत देण्याच्या बहाण्याने घाटकोपरमधील एका व्यवसायिकाला एकाने दोन लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत व्यवसायिकाने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
राजेश तिवारी असे यातील तक्रारदार यांचे नाव असून ते घाटकोपर परिसरात राहतात. एका खासगी कंपनीत त्यांची विमा पॉलीसी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते याचा नेहमी हप्ता भरत आहेत. या वर्षीचा हप्ता त्यांनी आद्यप भरला नसल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी एका इसमाने फोन केला. आपण विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगत आरोपीने त्यांना विम्याच्या हप्त्याबाबत माहिती देत, लवकर हप्ता भरल्यास यावर काही प्रमाणात सूट देण्यात येईल असे अमिष दाखवले.
तक्रारदार यांनी तत्काळ या इसमावर विश्वास ठेवत त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर दोन लाख तीन हजारांची रक्कम जमा केली. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन विमा पावती चेक केली असता, विम्याची रक्कम भरली गेली नव्हती. त्यामुळे त्यांनी संबंधित विमा कंपनीत संपर्क साधल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.