मुंबई : केवळ जमिनीची उपलब्धता आणि लोकांची मागणी आहे, म्हणून स्वतंत्र आले संशोधन केंद्र स्थापन करता येणार नाही. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या संशोधन केंद्राचे विस्तारीकरण करण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केली.
सतिश चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आले संशोधन केंद्राचा मुद्दा उपस्थित केला होता. मार्च २०२३ मध्ये तत्कालीन कृषिमंत्र्यांनी आले संशोधन केंद्राला निधी उपलब्ध करून देऊन आले मौजे गल्लेबोरगाव (खुलदाबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत संशोधन केंद्राचे काम रखडले आहे. या संशोधन केंद्राचे काम कधी मार्गी लागणार, असा सवाल चव्हाण यांनी केली होता.
देशात सुमारे १७,५०० हेक्टर क्षेत्रावर आल्याची लागवड होते, त्यापैकी राज्यात ५,३०० हेक्टर लागवडी केली जाते. प्रामुख्याने सातारा, संभाजीनगर, जालना जिल्ह्यात लागवड केली जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत मौजे गल्ले बोरगाव (खुलदाबाद) येथे आले संशोधन केंद्र स्थापन करण्यास २०२२ मध्ये मान्यता दिली होती. त्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन केंद्राने २०.६१ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता.
पण, नियोजन विभागाने आर्थिक भार वाढण्याची शक्यता गृहीत धरून केवळ जमिनीची उपलब्धता, मागणीच्या आधारे स्वतंत्र आले संशोधन केंद्र स्थापन करणे योग्य होणार नाही, असा अभिप्राय दिला होता. आजघडीला राज्यात सध्या ७६ संशोधन केंद्रे आणि १०९ अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प कार्यरत आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत १८ केंद्रे आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन केंद्र स्थापन करण्याऐवजी विद्यमान केंद्रांचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्रात हळदसह आले पिकावरही संशोधन सुरू आहे. तसेच वसमत येथील केंद्रातही आल्यावर संशोधन करता येईल का, याचा अभ्यास केला जात आहे. तसेच सदस्यांच्या भावना विचारत घेऊन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन आल्यासह इतर पिकांच्या संशोधनासाठी धोरण ठरवले जाईल, असेही कोकाटे यांनी म्हटले आहे.