scorecardresearch

तुम्हाला आणि फडणवीसांना कोणत्या अधिकाऱ्याने संपवण्याचा प्रयत्न केला? गिरीश महाजन नाव घेत म्हणाले, “तो…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला. आता स्वतः गिरीश महाजन यांनीच या प्रकरणावर भाष्य केलं.

Girish-Mahajan-Devendra-Fadnavis
गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. आता स्वतः गिरीश महाजन यांनीच या प्रकरणावर भाष्य केलं आणि कोणत्या अधिकाऱ्याने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला हे उत्तर दिलं. ते सोमवारी (२७ फेब्रुवारी) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, “आमचं हे प्रकरण जनतेसमोर आहे. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही जेव्हा पेन ड्राईव्हच्या स्वरुपात हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांना सांगितलं तेव्हा ते संपूर्ण राज्याने पाहिलं. प्रविण चव्हाण हे ‘स्पेशल पीपी’ आहेत. मविआ सरकारच्या काळात त्यांच्याकडे सर्व महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या होत्या. त्यामागे कोणाचा काय हेतू होता हे मला माहिती नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांच्यावर एक कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे सर्व पुरावे देण्यात आले आहेत.”

“मविआ सरकारने पुण्यातील सर्वच महत्त्वाचे गुन्हे ‘त्या’ अधिकाऱ्याकडे दिले”

“या प्रकरणात प्रविण चव्हाण यांना परवा जामीन मिळाला. परंतु हे खरं आहे की, या व्यक्तीने सर्व महत्त्वाच्या केसेस त्याच्याकडे ठेवल्या आणि लोकांची अडवणूक करून त्रास दिला. तसेच पैसेही जमा केले. हा त्याचा धंदा होता. मात्र, मविआ सरकारने पुण्यातील सर्वच महत्त्वाचे गुन्हे त्या अधिकाऱ्याकडे दिले होते. असं असलं तरी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून हे उघड झालं आहे,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

“…म्हणून मी आज तुरुंगाबाहेर आहे”

गिरीश महाजन पुढे म्हणाले, “माझ्यावर आजही मोक्का लागलेला आहे. न्यायालयाने मला सवलत दिली आहे म्हणून मी तुरुंगाबाहेर आहे. तीन वर्षे १२ दिवसांपूर्वी एक घटना घडली आणि गिरीश महाजन यांनी तू माझ्या नादी लागू नको अशी कोणाला तरी धमकी दिल्याचा आरोप करून माझ्यावर मोक्का लावण्यात आला. मी सहा टर्म आमदार आहे, मागे मंत्री होतो. माझ्याविरोधात कोणाला शिवी दिल्याची किंवा चापट मारण्याची राज्यात एकही तक्रार दाखल नाही. असं असूनही माझ्यावर थेट मोक्का लावण्यात आला.”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या अटकेबाबत CM शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “हे सर्व उद्योग…”

“गिरीश महाजन अडकले की, फडणवीस संपले”

“प्रविण चव्हाण मला आणि देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याविषयी बोलतात आणि ते रेकॉर्डही झालं आहे. त्याचं सिनेमा बघावं असं व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. त्यात ते सांगतात की, गिरीश महाजन यांना कोणत्याही परिस्थितीत तुरुंगात टाकावं लागेल, त्यांच्यावर मोक्का लावावा लागेल. त्यांना एकदा मोक्का लागला की, देवेंद्र फडणवीस संपले. गिरीश महाजन अडकले की, फडणवीस संपले. दोघे आहेत तोपर्यंत आपण भाजपाला थांबवू शकत नाही, असा त्या व्हिडीओत वारंवार उल्लेख झाला आहे.,” असंही महाजन यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 22:06 IST
ताज्या बातम्या