उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत, उड्डाणपुलांची कामे संथगतीने

मुंबई : स्थानिक रहिवाशांना पूर्व, पश्चिम भागात ये-जा करता यावी यासाठी दिवसभर रेल्वे मार्गावरील फाटकांची करावी लागणारी उघडबंद मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी बनू लागली आहे. त्यातच फाटक बंद करून रेल्वे आणि स्थानिक पालिकांच्या मदतीने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलांची कामे धीम्या गतीने सुरू असल्यामुळे लोकलसह मेमू, डेमू गाडय़ांचे वेळापत्रकही विस्कळीत होत आहे. त्याचा रेल्वे प्रवाशांनाही मनस्ताप होत आहे.

उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकावर रेल्वे फाटकांचाही परिणाम होत असतो. स्थानिक रहिवासी व वाहनांसाठी फाटक काही मिनिटांसाठी उघडल्यास लोकल थांबतात. ठरावीक वेळेपेक्षा जास्त वेळ फाटक सुरूच राहिल्याच्याही घटना अनेकदा घडतात. फाटकातून जाताना वाहन मध्येच बंद पडणे, फाटकातून रूळ ओलांडून जाताना स्थानिकांचे अपघात होणे यातून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेवरील कळवा, दिवा या फाटकांसह १३ रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची कामे सुरू झाली आहेत. मात्र, ती कामे अपूर्ण असल्यामुळे फाटक अद्यापही सुरूच आहेत. परिणामी रेल्वे आणि प्रवाशांनाही मोठा फटका बसत आहे.

मध्य रेल्वेवरील दिवा, कळवा, दिवा-वसई, दिवा ते पनवेल, कल्याण ते इगतपुरी फाटकांमुळे रेल्वे वेळात्रकावर परिणाम होत आहे. प्रत्येक फाटक हे दर दहा ते पंधरा मिनिटांनी उघडले जाते. त्यामुळे प्रत्येक फाटकामागे दिवसभरात २५ ते ३० लोकल फेऱ्या उशिराने धावतात. महत्त्वाच्या अशा कळवा खारीगाव येथील फाटक बंद करून तेथे वाहनांसाठी उड्डाणपूल उभारणीचे रेल्वे हद्दीतील काम मार्च २०१७ मध्येच पूर्ण करण्यात आले. तर पुलाचे काम ऑक्टोबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. परंतु अद्याप हा पूल सुरू झालेला नाही.

दिवा रेल्वे फाटकामुळेही मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात उड्डाणपुलासाठीच्या जागेची ठाणे पालिका व रेल्वे प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. उड्डाणपूल भारणीसाठी पूर्व व पश्चिम दिशेला विजेचे खांब व अन्य उपकरणे काढणे, पाया उभारणीसह विविध कामांना सुरुवात झाली. परंतु ही कामेही धीम्या गतीने सुरू आहेत.

मध्य रेल्वेने पुलाच्या गर्डर कामासाठी निविदा काढली आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, सध्या तरी ते पूर्ण होणे अवघड आहे. संपूर्ण उड्डाणपुलाचे काम होण्यासाठी किमान सव्वा ते दीड वर्ष लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निविदा प्रक्रिया सुरूच

दिवा ते वसई रेल्वे स्थानकादरम्यान चार रेल्वे फाटक, दिवा ते पनवेल दरम्यान दोन रेल्वे फाटक, कल्याण ते इगतपुरी दरम्यान असलेले एक फाटक बंद करून त्या ठिकाणी मध्य रेल्वे व स्थानिक पालिकांच्या मदतीने उड्डाणपूल उभारणी केली जाणार आहे. तर अन्य काही ठिकाणीही रेल्वे फाटके आहेत. काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया, तर काही ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. कल्याण ते इगतपुरी दरम्यान फाटक बंद करून रेल्वेकडून आपल्या हद्दीतील उड्डाणपूल कामासाठी निविदा काढली आहे. कल्याण डोंबिवली पालिका व रेल्वेकडून संयुक्त सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शिवाय जसई ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथेही असलेले रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपूल उभारणीची प्रक्रिया सुरू आहे.

रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपूल उभारणीच्या कामांना गती दिली जात आहे. यात महत्त्वाच्या असलेल्या दिवा व कळवा येथील उड्डाणपुलाच्या कामांचाही सामावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी