मुंबई : मागील आठवड्यात मुंबईकरांना मिळालेल्या किंचितशा तापमान दिलाशाला पूर्णविराम मिळाला असून मुंबईकरांना बुधवारी संपूर्ण दिवस उष्ण झळांचा सामना करावा लागला. कोरड्या वाऱ्यांमुळे दुपारी प्रवास करणारे मुंबईकर कासावीस झाले होते.

मुंबईमध्ये मागील काही दिवसांच्या तुलनेत तापमानात दोन दिवसांपासून किंचित वाढ झाली आहे. हवामान विभागच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३१.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत मागील दोन दिवसांपासून काही अंशानी तापमानात वाढ झाली. तापमान कमी नोंदले गेले असले तरी, कोरड्या, उष्ण वारा अधिक त्रासदायक ठरत आहे.

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमानाचा पारा २४ ते २६ अंशापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळीही अस्वस्थता जाणवू शकते. तर, कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशापर्यंत असेल. या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल. त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप सोसावा लागण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात मुंबईतील तापमानात सलग चार ते पाच दिवस घट झाली होती. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

पावसाची शक्यता

मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानुसार काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसतील.