Mumbai Rain Updates मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगरात मंगळवारी पहाटेपासून पाऊस कोसळत असून पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. साधारण आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दक्षिण मुंबई, पूर्व – पश्चिम उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

सोमवारी सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत झालेला पाऊस

विक्रोळी – ९५ मिमी

सांताक्रूझ – ९४.८ मिमी

जुहू – ५७ मिमी

वांद्रे – ४५ मिमी

भायखळा – ३७.५ मिमी

कुलाबा – १३.८ मिमी

रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’

हवामान विभागाच्या सुधारीत अंदाजानुसार, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यातच आता हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्टी, कोदवली, नारंगी, अर्जुना व शास्त्री नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. तसेच खेड येथील जगबुडी नदी अद्याप ही धोका पातळीवर वाहत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

विदर्भातही मुसळधार

विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागात पाणी साचले आहे. नदी-नाल्यांची पातळी झपाट्याने वाढली असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल व पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

पाऊस सक्रिय होण्याचे कारण काय ?

– अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या समांतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत उंच ढगांची निर्मिती होत असून, कमी वेळेत जास्त पावसाची नोंद होत आहे. अशीच स्थिती घाटमाथ्यावरही आहे.

– विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. कमी दाब क्षेत्राच्या परिघामध्ये उंच ढगांची निर्मिती होत आहे. परिणामी मराठवाड्यात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.

– बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तीव्रता वाढून त्यांचे रुपांतर डिप्रेशनमध्ये होणार आहे. या सर्व हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे राज्यात सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. पावसाचा जोर साधारण दोन दिवस कायम राहणार आहे.