मुंबई : राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागांत मंगळवारी देखील मुसळधार पाऊस कोसळत होता. गेल्या २४ तांसात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात मागील तीन दिवसांपासून मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा फटका अधिक बसला आहे. या भागात मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यातील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी ८:३० ते मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंत १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बुलढणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील जांभूळ मंडळात सर्वाधिक १७६ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर जळगाव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम या जिल्ह्यांतील भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, वाकडी, पिंपळगाव, वरखेडी, पारनेर तालुक्यातील टाकळी, पालशी, पाथर्डी आणि कारेगाव या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
मुंबईत हलक्या ते मध्यम सरी
मुंबई शहर तसेच उपनगरात मंगळवारी देखील हलक्या सरी बरसल्या. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी सकाळी ८:३० ते ५:३० पर्यंत १ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १० मिमी पावसाची नोंद झाली. तापमानात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी काहीशी वाढ झाली होती. दरम्यान, मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची फारशी शक्यता नाही.
मोसमी पावसाची आणखी काही भागातून माघार
मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास रविवारपासून सुरु झाला आहे. पश्चिम राजस्थानमधून रविवारी मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. त्यानंतर मंगळवारी राजस्थानचा काही भाग, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.
पावसाचा अंदाज कुठे
- मेघगर्जनेसह पाऊस
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड , हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, नागपूर
- मध्यम स्वरुपाचा पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर</p>