मुंबई : Himalaya bridge open छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरी रेल्वे स्थानकालगतच्या हिमालय पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून हा पूल आता पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर त्याच्या पुनर्बाधणीसाठी चार वर्षे लागली असून अखेर हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाला जोडण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.  

चार वर्षांपूर्वी १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळच्या हिमालय पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेला, तर ३० जण जखमी झाले. या पुलाच्या दुर्घटनेमुळे मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्राधिकरणावर प्रचंड टीका करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागातील तीन अभियंत्यांना अटकही  करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबईतील सर्वच पुलांचे सर्वेक्षणही करण्यात आले. मात्र हिमालय पुलाची पुनर्बाधणी कधी होणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले होते. हिमालय पुलावरून रोज हजारो प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये लोकल पकडण्यासाठी जात असत. दादाभाई नौरोजी अर्थात डी. एन. मार्गावरील हिमालय पूल पडल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रवाशांना रस्ता ओलांडून जावे लागत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलाचे बांधकाम..

हिमालय पूल पडल्यानंतर केलेल्या पाहणीत तो गंजल्याचे आढळले होते. त्यामुळे या पुलासाठी स्टीलच्या तुळईचा (गर्डर) वापर करण्यात आला आहे. हा पूल ३५ मीटर लांब व ६ मीटर रुंद आहे. पुलाच्या निर्मितीसाठी पोलाद, आरसीसी स्लॅब, ग्रॅनाईट पृष्ठभाग वापरण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी तासाला १८ हजार पादचारी या पुलाचा वापर करतील हे गृहीत धरून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.