मुंबई : ‘हिंदी सक्ती …नही चलेगी’ …या घोषणेतच एक विरोधाभास दडलेला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला शिवसेना (ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने, शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

यामध्ये शिवसैनिकांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने घोषणाही दिल्या. काही ठिकाणी अतीउत्साही शिवसैनिकांनी उत्साहाच्या भरात ‘नही चलेगी, नही चलेगी, हिंदी सक्ती नही चलेगी’ अशीही हिंदीतून घोषणा दिली. मग चूक लक्षात आल्यावर हिंदी सक्ती हाय हायच्या घोषणा सुरू झाल्या.

शिवसेना आणि रस्त्यावरून उतरून आंदोलन हे एकेकाळचे जसे समीकरण होते. तसेच शिवसेना आणि घोषणा हे सुद्धा एक जुने समीकरणच आहे. सुप्रसिद्ध घोषणा ही शिवसेनेची ओळख आहे. मात्र या घोषणांपैकी अनेक घोषणा या हिंदी भाषेत आहेत याकडे शिवसैनिकांचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

उद्धव साहेब आगे बढो…..

आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हिंदीतील घोषणा अधिक जवळच्या वाटतात. मोर्चा कोणताही असो, ‘ उद्धव साहेब आगे बढो…हम तुम्हारे साथ है ‘ ही घोषणा ठरलेली असते. कोणाच्या विरोधात मोर्चा असला तर ‘नीम का पत्ता कडवा है…..’ ही एक कडवट घोषणाही हिंदीतूनच दिली जाते. आपल्या नेत्याचे गुणगान गाताना ‘….अंगार है बाकी सब भंगार है’ ही घोषणा सुद्धा आपसूकच येते. हिंदी सक्तीच्या शासन निर्णय रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जो जल्लोष केला त्यातही ‘अंगार है भंगार है ची घोषणा ऐकायला मिळत होती.

गर्व से कहो…

हिंदीतल्या या घोषणांची आणि शिवसेनेची जवळीक तशी जुनीच आहे. दक्षिण भारतीयांविरोधात एकेकाळी शिवसेनेने जे आंदोलन पुकारले होते त्यातही ‘उठाव लुंगी…’ असा हिंदीतूनच नारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. तर ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही विश्व हिंदू परिषदेची घोषणासुद्धा शिवसैनिकांनी उचलून धरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या मार्मिक साप्ताहिकाच्या पहिल्याच पानावर एक उर्दू शेर कायम लिहिलेला असतो. ‘खिंचो न कमान को न तलवार, निकालो जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो’ हा हिंदी लिपीमध्ये लिहिलेला शेर मार्मिक साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर सर्वात वर असतो.