लोकशाही आणि राष्ट्रवाद या एका नाण्याच्या दोन बाजू : डॉ. ताओब
भारतीय राज्यघटनेचा ९५ टक्के भाग हिंदू तत्वज्ञानावर आधारित असल्याने या देशाला ‘हिंदुराष्ट्र’ म्हणून वेगळे जाहीर करण्याची गरजच नाही. भारतातील प्रत्येकाची जनुके एकच असून धर्म वेगळे असले तरी हिंदुत्व हीच येथील जीवनशैली आहे. सावरकरांपेक्षा गोळवलकर गुरुजींची हिंदुत्वाची व्याख्या अधिक व्यापक होती. भारताचे हिंदुत्व आणि इस्रायलचा यहुदीवाद यांमध्ये अनेक साम्यस्थळे असल्याने, यहुदीवाद (झायोनिझम) आणि हिंदुत्व या धर्मभगिनी आहेत, असे प्रतिपादन खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी मुंबईत एका चर्चासत्रात केले.
इंडो इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशन आणि मुंबईतील इस्रायल वाणिज्य महादूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यपीठाच्या पदवीदान सभागृहात ‘झायोनिझम आणि हिंदुत्वाच्या संदर्भात राष्ट्रसंकल्पना’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात, इस्रायलमधील इतिहासकार, लेखक, राजकीय भाष्यकार आणि जेरुसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. गाडी ताओब हेदेखील सहभागी झाले होते.
या चर्चासत्रात बोलताना डॉ. स्वामी आणि डॉ. ताओब यांनी यहुदीवाद आणि हिंदुत्व यांमधील साम्यस्थळांचे नेमके विवेचन केले. हिंदु धर्म आणि यहुदीवाद ईश्वराचे अस्तित्व मानतो. यहुदीवाद आणि हिंदुत्व यांमध्ये हे महत्वाचे साम्य असल्याने, या दोन्ही धर्मभगिनी आहेत, असे डॉ. स्वामी म्हणाले. हिंदुत्व म्हणजे ‘सनातन धर्म’ नव्हे, तर ती प्राचीन काळापासून चालत आलेली जीवनपद्धती आहे, असे सांगताना डॉ. स्वामी यांनी इसवी सनपूर्व ७०० वर्षांंच्या चिनी इतिहासाचा संदर्भ स्पष्ट केला. त्या काळातही चिनी लोकही इंदिगो असा उल्लेख करत असत. ‘इंदि’ म्हणजे हिंदु आणि ‘गो’ म्हणजे राष्ट्र, असे सांगून, चिनी साम्यवादाच्या अनुयायांनी हा इतिहास लक्षात घ्यायला हवा, असा टोलाही त्यांनी मारला. हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. भारत हे आपल्या पूर्वजांचे राष्ट्र आहे असे जे मानतात, ते सारे हिंदु, असा व्यापक विचार गोळवलकर गुरुजींनी मांडला होता, असेही डॉ. स्वामी म्हणाले. यहुदीवाद आणि हिंदुत्व यांतील महत्वाचे साम्य म्हणजे, हे दोन्ही धर्म सक्तीने धर्मांतरे घडवून आणत नाहीत. भारत हे लौकिकार्थाने हिंदुराष्ट्र नाही. पण, भारतीय राज्यघटनेत हिंदु तत्वज्ञानाचा स्वीकार स्पष्ट दिसतो, असे मानावयास जागा आहे. राज्यघटनेनुसार, सर्व धर्म ईश्वराची आराधाना करतात, आणि प्रत्येकास त्याच्या धर्माचे आचरण करण्याची मुभा आहे. हिंदू धर्माप्रमाणेच राज्यघटनेनेही पुरुष आणि महिलांना समान सामाजिक स्थान बहाल केले आहे. यहुदीवाद आणि हिंदुत्वावर आज इस्लामी दहशतवादाचे सावट दाटले आहे. त्यामुळे, आज आणि भविष्यातही, भारत आणि इस्रायल या दोघांनी एकत्र येणे अपरिहार्य ठरले आहे, असे डॉ. स्वामी म्हणाले.
हाच धागा पकडून डॉ. ताओब यांनीही इस्रायल आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक नात्याचे पदर उलगडले. लोकशाही आणि राष्ट्रीयत्वाची भावना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही बाबी एकमेकांसोबतच असल्या पाहिजेत. दुर्दैवाने अलीकडे राष्ट्रीयत्वाची संकल्पना बदनाम होऊ लागली आहे. मात्र, भक्कम लोकशाहीसाठी समाजात राष्ट्रभावना जागृत असलीच पाहिजे, कारण राष्ट्रीयत्वाची भावना ही लोकशाहीची ताकद आहे. भारतामध्ये अलीकडे राष्ट्रभावना बळावत आहे, ही समाधानाची बाब आहे. हीच भावना पूर्व युरोपीय देशांत, हॉलंड, ऑस्ट्रिया, जर्मनीमध्येही मूळ धरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘राष्ट्रीयत्वाच्या भावनेमुळेच भारताचा ब्रिटिशांशी लढा’
राष्ट्रीयत्वाच्या भावनेमुळेच भारताने ब्रिटीश राजवटीशी कडवा लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले. राष्ट्रभावना दाबण्याचा प्रयत्न केला तर ती हिंसक रूपात अधिक उसळते. झायोनिझमची स्थापना याच संकल्पनेतून झाली. समाजास आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणे हीच यहुदीवादाची धारणा आहे, असे डॉ. ताओब म्हणाले. ज्यू समाजाने दोन हजार वर्षे अनन्वित अत्याचारांचा सामना केला. हजारो ज्यूंची कत्तल झाली. या समाजास स्वत्व देण्याचे, माणसास त्याच्या अस्तित्वाचे भान देण्याचे तत्वज्ञान यहुदीवादात आहे, असा दावा त्यांनी केला.