मुंबई : अवेळी लोकल सेवा, लोकलच्या फेऱ्या वाढविण्यावर मर्यादा, गर्दीमुळे प्रवाशांचा होणारा मृत्यू यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने नवीन प्रस्ताव तयार केला आहे. लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यासह त्यांची वारंवारता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी साधारणपणे ५,८०० रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल शटल सेवेत रुपातरित करण्याचे नियोजन आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे माजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश गोयल व रेल्वे अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. गेल्यावर्षी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाचे कौतुक करून, या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी निधीची चिंता करू नये, असे आश्वासन दिले होते. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास वेळेत आणि गर्दी विभाजित करण्यास मदत होणार आहे. सध्याच्या उपनगरीय रेल्वेला आठ विभागात विभागून गर्दीच्या वेळी दर चार मिनिटांनी एका लोकलची वारंवारता वाढवण्याचा उद्दिष्ट्य आहे.
लोकल फेऱ्यांची वारंवारता वाढविण्यासाठी, कमीत कमी वेळेत इच्छित स्थानक गाठण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आश्विनी वैष्णव यांच्यासमोर या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रस्तावाबाबत ते सकारात्मक आहेत. या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी होणे शक्य नाही. परंतु, पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी कामे पूर्ण झाल्यास हा प्रकल्प यशस्वी ठरेल. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी अंदाजे ५,८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
या प्रस्तावाबद्दल सखोल चौकशी व खात्री केल्यानंतरच याबद्दलची पुढील कार्यवाही करण्यात येईल. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
विभाग – लोकल फेऱ्यांमध्ये वाढ – लोकलची वारंवारता
सीएसएमटी – ठाणे (धीम्या) – ३७ – ४ मिनिटे
ठाणे – कल्याण (धीम्या) – ५४ – ४ मिनिटे
सीएसएमटी – कल्याण (जलद) – २१० – ४ ते ६ मिनिटे
कल्याण – कसारा (धीम्या) – ३२८ – ४ ते ६ मिनिटे
कल्याण – कर्जत (धीम्या) – २७२ – ४ ते ६ मिनिटे
कर्जत – खोपोली – ८६ – २० मिनिटे
कळवा/ठाणे -वाशी/नेरुळ – १३८ – ६ मिनिटे
सीएसएमटी – पनवेल (धीम्या) – १६ – ४ ते ६ मिनिटे
पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार
– सीएसएमटी ते ठाणे (धीम्या) या विभागात सहा उप मार्गिका (स्टॅबलिंग लाइन) आणि सीएसएमटी ते कल्याण (जलद) या विभागात कुर्ला येथे १४ आणि ठाकुर्ली येथे २० उप मार्गिका तयार कराव्या लागणार आहेत.
– लोकल रेक २३८ वाढवावे लागतील.
– रेल्वे विभागात नवीन फलाटांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
लोकल फेऱ्या वेळेत चालविण्यात येणारे अडथळे
– दिवा, चुनाभट्टी, शिवडी येथील समांतर रस्ता फाटक (एलसी गेट)
– लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या उशिराने धावणे
– लोकल किंवा लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीमध्ये आपत्कालीन साखळी (अलार्म चेन पुलिंग) खेचण्याच्या घटना
– रेल्वे मार्गालगतच्या वस्तीतून रेल्वे मार्गावर कचरा फेकणे