मुंबई : दक्षिण मुंबईमधील पी. डिमेलो मार्गापर्यंत असलेला पूर्व मुक्तमार्ग ग्रॅन्ट रोडला जोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने या कामासाठी पुन्हा एकदा निविदा मागवल्या आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र हे काम रखडले असून आता पुन्हा मागवण्यात आलेल्या निविदेमध्ये प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. गेल्यावर्षी या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च ६६२ कोटी रुपये अपेक्षेत होता. आता तो ११०० कोटी रुपयांवर गेला आहे.

चेंबूरमधून सुरू होणारा पूर्व मुक्तमार्ग दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गापर्यंत आहे. या मार्गावरून सुसाट येणारी वाहने पुढे वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट येथून एक पूल प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड रेल्वे स्थानक परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग येथून ग्रँन्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान सुमारे ५.५६ किलोमीटर अंतर असून वाहतूक कोंडी लक्षात घेता पूर्व मुक्त मार्गावरून ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी सध्या ३० ते ५० मिनिटे इतका कालावधी लागतो. मात्र, भविष्यात मुंबईकरांच्या सेवेत उन्नत मार्ग रुजू झाल्यानंतर पूर्व मुक्त मार्गावरून केवळ ६ ते ७ मिनिटांमध्ये लागतील. दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत, सुलभ, वेगवान होण्यास उन्नत मार्गामुळे मोठे बळ मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम अजून सुरूही झालेला नसताना त्याचा अंदाजित खर्चात वाढ झाली आहे. दरम्यान, याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या पुलाच्या आराखड्यात काही तांत्रिक बदल करावे लागले आहेत. आधी हा पूल सामान्य पद्धतीने बांधण्यात येणार होता.

हेही वाचा : मुंबई : आरटीई मान्यतेशिवाय २१८ शाळा, मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे प्राथमिक शिक्षक संचालकांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलाद वापरामुळे खर्च

गेल्यावर्षी पालिकेच्या पूल विभागाने फेब्रवारी महिन्यात या प्रकल्पासाठी निविदा मागवली होती. त्यावेळी या प्रकल्पासाठी ६६२ कोटी खर्च होतील असे अंदाजित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर वर्षभरात या प्रकल्पामध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकल्पाबाबत चर्चा आणि खल सुरू होते. आता पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा निविदा मागवल्या आहेत. उन्नत रस्त्याच्या बांधकामाकरीता आराखडा व बांधणी याकरीता यावेळी मात्र अंदाजित खर्चात वाढ झाली असून १,१२३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुलाच्या आराखड्यात बदल झाला असून पोलादाचा वापर वाढल्यामुळे खर्चात वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.