मुंबई : मुंबईतील बहुसंख्य घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते. त्यामुळे भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट यादरम्यान धीम्या मार्गावर लोकल धावतील.

मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबईबाहेरून असंख्य भाविक येतात. त्यांना मुंबईत येण्यासाठी आणि पुन्हा मुंबईतून परतीचा प्रवास करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गुरुवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी चार लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चचर्गेटहून विरारसाठी रात्री १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२० वाजता लोकल सुटेल. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि पहाटे ३ वाजता लोकल सुटेल.

हेही वाचा : विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेवर गर्दीच्यावेळी अप जलद मार्गावरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान थांबत नाही. मात्र गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपासून ते रात्री ८.३० वाजेपर्यंत अप दिशेकडे जाणाऱ्या सर्व जलद लोकल, मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान चर्नी रोड सहित सर्व स्थानकात थांबेल. चर्नी रोड स्थानकात फलाट क्रमांक २ वर प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत अप धीम्या लोकल चर्नी रोडवर थांबणार नाहीत. त्यामुळे चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर कोणतीही लोकल सेवा उपलब्ध नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.