मुंबई : नवी दिल्लीतील कायमस्वरूपी प्रवासी विश्रांतीगृहाच्या (होल्डिंग एरिया) धर्तीवर मुंबईतील अनेक प्रमुख टर्मिनससह भारतीय रेल्वेवर कायमस्वरूपी ७६ प्रवासी विश्रांतीगृहे बांधण्याच्या योजनेला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली. सणासुदीच्या काळात अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी उत्सवांपूर्वी मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी प्रवासी विश्रांतीगृहे बांधण्यात येणार आहेत.

महाकुंभ मेळ्याच्या वेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन अनेक प्रवासी जखमी झाले होते. तसेच, त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. महाकुंभ मेळा सुरू असताना प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत अचानक वाढ झाल्याने ती दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर कायमस्वरूपी प्रवासी विश्रांतीगृह चार महिन्यांत बांधण्यात आले. त्यामुळे सण-उत्सव आणि प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ही सुविधा प्रभावी ठरली.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), दादर, नागपूर, नाशिक रोड आणि पुणे अशा सहा स्थानकांमध्ये कायमस्वरूपी प्रवासी विश्रांतीगृह उभारण्यात येणार आहेत. तर, पश्चिम रेल्वेअंतर्गत मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, उधना, सुरत, अहमदाबाद, उज्जैन, वडोदरा आणि सिहोर येथे आठ विश्रांतीगृहे बांधण्यात येणार आहेत. देशभरात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन विश्रांतीगृहे बांधण्यात येतील. तसेच २०२६ च्या उत्सव काळापूर्वी सर्व विश्रांतीगृहे बांधून सज्ज करावे, असे निर्देश वैष्णव यांनी दिले.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील कायमस्वरूपी विश्रांतीगृह अंदाजे सात हजार प्रवाशांना सामावून घेईल अशा नियोजनबद्ध पद्धतीने उभे केले आहे. तसेच, प्रवाशांची रहदारी योग्यरित्या होण्यासाठी हे विश्रांतीगृह तीन विभागात विभाजित केले आहे. यात तिकीट काढण्यापूर्वीचे प्रवासी, तिकीटधारक प्रवासी आणि रेल्वेगाडीत चढणारे प्रवासी असे तीन विभाग आहेत. या तिन्ही विभागात प्रवासीभिमुख सेवा प्रवाशांना प्रदान केली आहे. यामध्ये शौचालये, तिकीट खिडक्या, स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन आणि मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे.

कायमस्वरूपी प्रवासी विश्रांतीगृहांमुळे प्रवाशांना आरामात रेल्वेगाडीची वाट पाहता येईल. तसेच वर्दळीच्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा होईल. विश्रांतीगृहात पुरेशी आसन व्यवस्था, शौचालय, ‘मे आय हेल्प यू’ सुविधा, आरोग्य सुविधा, चौकशी खिडकी, तिकीट खिडकी आणि रेल्वेगाड्यांची माहिती देणारे फलक असतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.