मुंबई: दिवाळीनंतर मुंबईकडे परतीचा प्रवास करणारे आणि छटपूजेनिमित्त मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. संपूर्ण रेल्वे परिसर आणि स्थानके प्रवासी त्यांच्या सामानाने व्यापले आहे. त्यामुळे प्रवाशांना रहदारी करताना अडचणी येऊन, गोंधळ उडत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई विभागातील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल स्थानकांवर २४ नोव्हेंबरपर्यंत दर दिवशी काही तासांसाठी फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

छटपूजेसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली असून, मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) गर्दीमय झाले होते. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेत वाढ केली आहे. सीएसएमटी, दादर, एलटीटी स्थानकात आरपीएफ, श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. मात्र वाढीव प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी, मध्य रेल्वेने पुढील ७ दिवस फलाट तिकीट विक्री बंद केली आहे.

हेही वाचा… आतापर्यंत ८०४६७ गिरणी कामगार, वारसांची कागदपत्रे सादर

एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकात सोडायला किंवा स्थानकातून नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसाठी फलाट तिकीट काढावे लागतात. यासह फलाटावर काही काळ थांबण्यासाठी अनेकांकडून फलाट तिकीट घेतले जाते. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढते. परिणामी इतर प्रवाशांना इच्छित फलाटावर, रेल्वेगाडीत पोहचण्यास विलंब होतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३० वाजता, एलटीटी येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ पर्यंत आणि पनवेल येथे रात्री ११ ते रात्री २ वाजेपर्यंत फलाट तिकीट मिळणार नाही. या निर्बंधामधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले आणि महिला प्रवाशासोबत स्थानकावर येणाऱ्या एका व्यक्तीला फलाट तिकीट मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्दीचे नियोजन करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत दरदिवशी काही तासांसाठी फलाट तिकीट विक्री बंद केली आहे. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे