मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धडकलेल्या मोर्चामुळे शुक्रवारी मुंबईचे जनजीवन आणि व्यवहार पूर्णपणे कोलमडून पडले. मराठा आंदोलकांच्या वाहनांमुळे अटलसेतू, पूर्वमुक्त मार्गासह ठप्प झालेले रस्ते, तिन्ही रेल्वे मार्गांवरून मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमुळे ओसंडून वाहणाऱ्या लोकलगाड्या, आझाद मैदान अपुरे पडल्यानंतर दक्षिण मुंबईभर पसरलेले कार्यकर्ते, सीएसएमटी स्थानकात उसळलेली गर्दी, मंत्रालयासह अनेक ठिकाणी फिरणारे जत्थे या सर्वांमुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे मोठे हाल झाले. तर संततधार पाऊस आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, दुकाने बंद करण्यात आल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंदोलकांनाही प्रचंड त्रास सोसावा लागला.
मराठा आऱक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निर्णायक आंदोलन सुरू असून आंदोलकांचा मुंबईतच मुक्काम वाढल्याने शनिवारीही हीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शुक्रवारी सकाळपासून निघालेले आंदोलक मुंबईत दाखल झाले आणि दररोज वेगाने धावणाऱ्या मुंबईकरांचा वेगच मंदावला. या मोर्चासाठी पोलिसांनी केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्षात तब्बल २० ते २५ हजार आंदोलक आझाद मैदानात दाखल झाल्याने मोठा गोंधळ उडाला.मैदानातील जागा पुरेनाशी झाल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा सीएसएमटीसमोरील रस्त्यावर आणि नंतर रेल्वेस्थानकात वळवला. आझाद मैदान, मुंबई महापालिका मुख्यालय परिसरातील रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे चर्चगेट, नरिमन पॉइंट आणि सीएसटीदरम्यान वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकातून निघालेल्या नागरिकांना बस अथवा टॅक्सी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना पायी कार्यालय गाठावे लागले.
आझाद मैदानावर आंदोलकांना उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. संततधार पावसामुळे मैदानावर चिखल झाला होता. त्यामुळे आंदोलकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मैदानातून विखुरलेले आंदोलक मंत्रालयासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी धडकले. ढोलताशे, हलगीच्या तालावर रस्त्यात नृत्य करत, घोषणाबाजी करत आंदोलक फिरू लागल्यामुळे अंतर्गत परिसरही बंद करण्यात आले. नरिमन पॉइंट परिसरातील खाद्यविक्रीची दुकानेही बंद ठेवण्यात आली. त्यामुळे आंदोलकांनी मरिन ड्राइव्ह येथे काही काळ ‘रास्ता रोकाे’ही केला.
सीएसएमटी स्थानकात मुक्काम
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटी) आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली होती. सीएसटीवरील यंत्रणा कोलमडून पडली होती. आंदोलकांनी हलगी वाजवत घोषणाबाजी सुरू केल्यामुळे सीएसएमटी स्थानकावर गोंधळ उडाला होता. काही आंदोलक रूळावर उतरल्यामुळे लोकलच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना सीएसएमटी स्थानकाबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता, पण आंदोलकांची संख्या मोठी असल्याने सर्व यंत्रणा अपुऱ्या पडत होत्या, पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतूवर कोंडीआंदोलक सकाळी वाहनाने अटल सेतू आणि पूर्व मुक्त मार्गाने मुंबईच्या दिशेने येऊ लागले. पुढे मार्ग बंद असल्याने वाहनचालकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभर पूर्व मुक्त मार्ग बंद होता. मुक्त मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
लोकलमध्ये प्रचंड गर्दी
मराठा आंदोलकांचे जथ्येच्या जथ्ये शुक्रवारी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठत होते. कसारा, कर्जतपासून पालघर, वसई-विरार येथून येणाऱ्या आंदोलकांनी लोकल ट्रेनमध्ये गर्दी केल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना फटका बसला. लोकलमध्ये आंदोलकांची गर्दी, रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने अनेकांना कार्यालयात पोहोचायला विलंब झाला, तर अनेकांनी गर्दी, वाहतूक कोंडी पाहून कार्यालयाऐवजी घरी जाणे पसंत केले.
आजही कसोटी
आंदोलनासाठी दीड हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी संयमाने आंदोलन हाताळले. आंदोलक आक्रमक पवित्र्यात असतानाही पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक काही प्रमाणात सुरळीत केली. आंदोलनासाठी एक दिवसांची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी आंदोलन हाताळण्याचे नियोजन केले होते. मात्र आंदोलनासाठी शुक्रवारी संध्याकाळी आणखी एक दिवसांची मुदत देण्यात आल्याने शनिवारी पोलिसांचा कस लागणार आहे.
‘बेस्ट’च्या ४० बसमार्गांत बदल
वाहतूक कोंडीमुळे बसचे वेळापत्रक कोलमडले, अनेक बसगाड्या ३०–४५ मिनिटे उशिरा धावत होत्या. आंदोलनामुळे शहीद भगतसिंग रोड, मानखुर्द येथील शीव-पनवेल महामार्ग, सीएसएमटी, डायमंड गार्डन, शीव–तुर्भे रोड, देवनार आगार परिसर, महाराणा प्रताप चौक या महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गांवरून धावणाऱ्या अनेक बस पर्यायी मार्गांवरून वळवाव्या लागल्या तर अनेक फेऱ्या रद्दही कराव्या लागल्या.
आंदोलकांचा ओघ सुरूचआझाद मैदानासह दक्षिण मुंबईत मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर पोहोचले असतानाच, दुसरीकडे राज्याच्या ग्रामीण भागांतून मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात मुंबईकडे मार्गक्रमण करीत आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईच्या वेशीवर वाशी, पनवेल, कल्याण भागात पोहोचले आहेत. आंदोलकांच्या वाहनांना मुंबईत येण्यास रस्ता नसल्यामुळे वाहने वाशी, पनवेल, कल्याण भागात उभी करून आंदोलक पायी किंवा लोकलने प्रवास करीत आझाद मैदान गाठण्याचा प्रयत्न करीत होते. गणरायाच्या दर्शनाची ओढआंदोलनाच्या निमित्ताने आलेल्या आंदोलकांनी दुपारनंतर मुंबईतील गणेशदर्शनाकडे मोर्चा वळवला. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीसह गिरगाव, दादर आणि शीव परिसरातील गणेश मंडळांच्या इथे राज्यभरातून आलेल्या आंदोलकांची दर्शनासाठी रांग लागल्याचे दिसून आले.
पालिकेकडून सुविधा
आंदोलकांची संख्या लक्षात घेता, महानगरपालिकेने आवश्यक त्या विविध नागरी सेवा-सुविधा पुरवल्या आहेत. आझाद मैदानात शुक्रवारी पावसामुळे चिखल झाला होता. ही बाब लक्षात घेत पालिकेने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात कीटकनाशक धूरफवारणी केली. तसेच, आंदोलनस्थळी प्रवेशमार्गाजवळ झालेला चिखल हटवून, त्या मार्गिकेवर २ ट्रक खडी टाकून रस्ता समतल करण्यात आला. आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरातील ‘पैसे घ्या व वापरा’ तत्त्वावरील सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी
आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्यासाठी एकूण ६ टँकर पुरविण्यात आले होते. त्यानंतरही अतिरिक्त टँकर मागविण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आंदोलनकर्त्यांच्या उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय आंदोलनस्थळ व संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात स्वच्छतेसाठी पुरेशा संख्येने कर्मचारी नेमण्यात आले आहेत.