मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचे अनेक कल चाचण्यांतून स्पष्ट होत आहे. या राज्यांच्या निकालानंतर राज्यात इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाला वेग येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगितले.
महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभा मे महिन्यापर्यंत झाल्या. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यानंतर आतापर्यंत फारसे काही घडले नाही. मात्र मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांच्यासह पक्षाचे आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. यामुळे महाविकास आघाडीच्या हालचाली मंदावल्या. पण लवकरच जागा वाटपाच्या घडामोडी वेग घेतील. पाच राज्यातील निकालानंतर राज्यातील जागा वाटपाची चर्चा वेगाने सुरू होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>पंधरा कोटींच्या कोकेन तस्करीप्रकरणी नवी दिल्लीतून परदेशी महिलेला अटक
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १५ जागांच्या आसपास लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. उमेदवार जवळपास निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा मतदार संघाचे आढावे घेऊन झाले. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे, रावेर, सातारा, कोल्हापूर, दिंडोरी, बीड आदीसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करीत आहोत. लोकसभेनंतर विधानसभेसाठी आम्ही तयारी करीत आहोत. यासाठी उमेदवारांची निवड करून त्यांना पक्षात घेतले जात आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
