मुंबई : चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावारून केलेल्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हर्षल परमार (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. जोगेश्वरी येथील सुभाष नगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी चौघांना अटक केली.

गोरेगाव पश्चिमे येथील सुभाष नगरमधील तीन डोंगरी परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. रविवारी मध्यरात्री चार तरुण इमारतीच्या आवारात शिरले. त्यांनी झोपलेल्या कामगारांचे मोबाइल चोरले. त्यानंतर मजूर आणि सुरक्षा रक्षकांनी या चोरांचा शोध सुरू केला. त्यावेळी इमारतीच्या आवारात शिरलेले तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

तर एका तरूणाला मजुरांनी पकडले. मजुरांनी त्या व्यक्तीला दोऱ्यांनी बांधले आणि त्याला बांबूच्या काठ्या, लाथा आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत तो तरून बेशुध्द पडला. सकाळी त्याला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉम केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मारहाण करणाऱ्या चार मजूरांना अटक

हर्षल परमार (२६) बेरोजगार होता. हर्षल १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घराबाहेर गेला, पण तो परत आला नाही, असे त्याच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले. हर्षल सराईत चोर होता. मात्र, हर्षल चोरीच्या उद्देशाने तेथे गेला होता का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगीतले.

पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०१३ (१) हत्या, तसेच २ (५) संगनमत करून कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सलमान खान, इस्मुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.