मुंबई : सांताक्रुझ येथील जुहू तारा मार्गावरील किशोरकुमार गांगुली बंगल्याजवळ बुधवारी दुपारी झाड पडले. खाजगी इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना अचानक इमारतीची संरक्षक भिंत लगतच्या झाडावर कोसळली आणि ते झाड एका महिलेच्या अंगावर पडले. या विचित्र अपघातात महिला गंभीर झाली असून कुपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून किशोरकुमार गांगुली बंगल्याजवळील एका खाजगी इमारतीचा पुनर्विकास सुरू आहे. या इमारतीची संरक्षक भिंत बुधवारी अचानक लगतच्या झाडावर कोसळली. भिंतीच्या वजनाने ते झाड रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या अंगावर पडले. सलोनी सचिन चव्हाण (३६) असे या महिलेचे नाव आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य हाती घेतले. मातीचा ढिगारा आणि झाड बाजूला करून महिलेची सुटका करण्यात आली. तसेच जखमी महिलेला उपचारासाठी नजीकच्या कुपर रुग्णालयात नेण्यात आले. सद्यस्थितीत जखमी महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डोक्यात वीट पडून मृत्यू
जोगेश्वरीतील धोबीघाट परिसरातही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून वीट खाली पडून २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. वीट डोक्यात पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली.