मुंबई : गृहपाठ देण्याच्या बहाण्याने ८ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५४ वर्षीय शिक्षकाला कांजुरमार्ग पोलिसांनी अटक केली. आरोपी नवी मुंबईतील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कांजुरमार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७५ व पोक्सो कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार शुक्रवारी हा प्रकार घडला. शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलगी घरी परतली असता ती रडू लागली. तिच्या आईने तिला त्याबाबत विचारले असता गणिताच्या तासाला शिक्षकांनी स्वाध्याय व गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या बहाण्याने पीडित मुलीशी अश्लील कृत्य केल्याचे तीने सांगितले.
अखेर मुलीच्या आईने याप्रकरणी स्थानिक कांजूरमार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी प्रकणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी शिक्षकाला शनिवारी याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ
मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्या अंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.
२०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांच्या उकल होण्याच्या प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचीत व्यक्त आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले होते.